गुलाम बनायचे नसेल तर हुकूमशाही आत्ताच मोडून काढावी लागेल! उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱयांवर आसुड

देशात सत्ताधाऱयांची सुरू असलेली हुकूमशाही आपल्याला आत्ताच मोडून काढावी लागेल. नाही तर आपल्याला पुन्हा डोके वर काढता येणार नाही. सर्वसामान्यांना कायमच गुलाम बनून रहावे लागेल. मी असे कदापि होऊ देणार नाही. यासाठीच मी हा लढा देत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सत्ताधाऱयांवर सणसणीत आसुड ओढला. माझा लढा कुणा एका व्यक्तीविरोधात नाही तर वृत्तीविरोधात आहे. जनतेला काय पाहिजे हे सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज सरकारच्या कानापर्यंत कसा पोहोचवायचा हे शिवसेनेला चांगलेच कळते, असेही त्यांनी ठणकावले.

मिंधे गट, भाजप आणि मनसेच्या कारभाराला कंटाळलेल्या ठाणे, पालघरमधील शेकडो पदाधिकाऱयांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. नेहमी सत्ता असलेल्या पक्षात लोक प्रवेश करीत असतात. मात्र सध्या आमच्याकडे सत्ता नसतानाही शिवसेनेत अनेकजण प्रवेश करीत आहेत. कारण देशातील हुकूमशाहीला गोरगरीब जनता प्रचंड त्रासून गेली आहे. त्यामुळेच पालघरमध्ये सत्ताधारी पक्षाला खिंडार पडले आहे. लढवय्ये सैनिक माझ्यासोबत आले आहेत. त्यामुळे राजकारणातील गद्दारांना गाडायला आता वेळा लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपण पालघरमध्ये पोटनिवडणुकीत लढलो. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलो. त्यामुळे आता येणाऱया निवडणुकीत आपल्याला फडकणारा भगवा कायम ठेवायचा आहे, असो आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पालघरमध्ये लवकरच जाहीर सभा

लवकरच मी पालघरमधील पदाधिकाऱयांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दौरा करणार असल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी जाहीर सभादेखील घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी देशातील वातावरणावर आपण बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढवण बंदर, आदिवासींचे प्रश्न अशा समस्यांबाबत भूमिपुत्रांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जगात फक्त एकमेव हिंदुहृदयसम्राट!

केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणजे फक्त आणि फक्त एकमेव वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! मात्र मिंध्या गद्दारांकडून त्यांची ही उपाधी चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे कदापि शक्य नाही. लढवय्या सैनिक अशा गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. अशा गद्दारांना गाडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शिवसेनेत लोकं येत आहेत.