तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर घणाघात

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी रविवारी बुलढाण्यातील खामगाव येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. ”राज्यात नैसर्गिक संकट आलं तेव्हा महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सारखे इथे येत आहेत. मात्र त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. त्यांचं फक्त तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा असं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर देखील टीका केली. ”भवानी मातेचा गजर आमच्या हृदयात कोरलेला आहे. तुम्ही तो काढू शकणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’, अशा शब्दात उद्धव ठारे यांनी निवडणूक आयोगाला देखील फटकारले.

”हल्ली मोदी सतत महाराष्ट्रात येतायत. शेतकऱ्यांवर कधी नापिकीचं, दुष्काळाचं तर कधी अवकाळी पावसाचं संकट येतंय. आता पण अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता नरेंद्र मोदी सगळीकडे फिरतायत पण ते आले का तुमची शेती बघायलाय़. या भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे अश्रू पुसायला मोदीजी किंवा अमित शहा आले होते का? महाविकास आघाडीचे जेव्हा सरकार होते तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जमाफीचा घेतला होता. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केलं होतं. नैसर्गिक संकट आलं त्यानंहीतर महाविकास आघाडीने केलेली मदत शेतकऱ्यांना मिळत होती. पण मोदींना मात्र असं झालंय की तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा. 2047 ला तुमचं उत्पन्न चौपट करू म्हणतात पण अरे पण आज रात्री काय खाऊ… ते सांगा. 2014 ला हे म्हणालेले की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होतात. यांच्या नमो सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना सहा हजार मिळतायत. पण शेतकरी शेतीसाठी जवळपास एक लाख रुपयांचं खत विकत घेतो. त्या खतावर त्याला अठऱा टक्के जीएसटी लागतो. 1 लाखावर 18 हजार जीएसटी. म्हणजे त्यातले सहा हजार तुम्हाला देऊन मोदींच्या खिशात 12 हजार जातात. तुमच्याच खात्यातून घेतलेले पैसे तुम्हाला भीक दिल्यासारखे देतात. हे का यांचं नमो सन्मान”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

”विदर्भात यांचं सरकार असलेल्या साडे सात वर्षात किती उद्योग आणले. किती मुलांना काम दिलं. मी काही बोललो की यांच्या अंगाचा तिळपापड होतो. यांनी शेतकऱ्याचं जे उत्पन्न दुप्पट करूचं वचन दिलं होतं. पण आता शेतकऱ्यांना पिकविमा मिळत नाही, शेतमालाला भाव नाही. निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची वाट लावत आहे. मुलांना नोकऱ्या देत नाही. यांना विदर्भात उद्योगधंदे आणायचे नाही. ते विदर्भाला फक्त गाजर दाखवतायत. मोदीजींना सर्व गुजरातला न्यायाचे आहे. पुण मोदीजी तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर गुजरातच्या हक्काचे त्यांना देणारच. पण गुजरातच्या समृद्धीसाठी महाराष्ट्राच्या मातीतलं ओरबाडून गुजराला देणार असाल तर याद राखा तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

”आज सगळे संतापून पेटले आहेत. दहा वर्ष अख्ख्या देशाच्या जनतेच्या आयुष्यातली दिली. तुमच्या थापांवर विश्वास ठेवून दिली. नोटबंदी केली. रांगेत सामान्य जनता होती. त्यावेळी नोटबंदीनंतर तुम्हाला जे काही मिळणार होतं ते झालं काय. यांच व्हॅक्युम क्लिनर झालं आहे. भ्रष्टाचारी माणसांना शोधत यांची माणसं फिरत असतात व नंतर यांचा व्हॅक्यूमने ते खेचून घेतात. मोदीजींच्या पक्षावर ही वेळ आली आहे. शिवसेना सोबत होती. त्यावेळी तुम्ही किती वेळा आला होतात प्रचारासाठी. दोन ते चार वेळा. मात्र आता तुम्हाला दारोदारी भटकावं लागतं आहे, मतांची भीक मागावी लागतेय. कारण छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावायचं पाप तुम्ही गद्दारंकडून करून घेतलं आहे. उद्धव ठाकरेंना संपवलात तरी संपूर्ण भाजप देशभरातून माझ्या अंगावर येतोय. एक साधा माणून ज्याचं पक्ष चोरला, चिन्ह चोरला त्याचे वडिलही चोरले. तरिही जनता तुमच्या सोबत येत नाही. त्याला मी काय करणार. तुमचं पाप आहे ते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना बोलताय. आता ही नकली शिवसेना असली दणका तुम्हाला या निवडणूकीत दाखवतो. याच शिवसैनिकांनी तुम्हाला पंतप्रधान करायला मेहनत घेतली होती. त्यांना तुम्ही नकली म्हणताय. शिवसेनेला तुम्ही नकली बोलताय? नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या प्रचारगीतावरून दिलेल्या आदेशावर देखील उद्धव ठाकरे यांनी टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाला फटकारले. ”यांच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी आमच्या हृद्यात महाराष्ट्राच्या हृदयात कोरलेल्या भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही काढू शकणार नाही. मशाल गीत. काय आम्ही घोडं मारलं आहे तुमचं. मी आज उद्या नेहमी बोलणार. हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा. तुम्ही जय श्री राम बोलता. आम्ही देखील बोलतो. कर्नाटकात जय बजरंग बली बोलता. राम ललाचं दर्शन मोफत देऊ बोलता. आम्ही फक्त महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मातेचं गजर केला. भवानी मातेला वंदन केल्याशिवाय, तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी माहाराजांनी स्वराज्याची सुरुवात केली होती. तिचे आशिर्वा द जनतेच्या रुपाने माझ्या समोर बसले आहेत. निवडणूक आयोग तुम्ही माझं नाव, चिन्ह गद्दारांना दिलं. आम्ही त्या विरोधात लढतो आहोत. लोकशाही अजूनही जिवंत आहे व ती जिवंत ठेवायला आमचे कार्यकर्ते लढत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”जे भाजपशी लढत आहेत त्यांना बदनाम केलं जातंय. त्यांच्या कुटुंबाची बदनामी करायची. नाहीतर एक तर भाजपात या किंवा तुरुंगात जा असा दबाव आणायचा. काही नेभळट लोकं गेली. भाडखाऊ जनता पक्षाची कीव येते मला. आता तुमचं काय झालंय. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन जातात. यांच्याकडे घोटाळा मोठा तेवढा मान मोठा. 70 हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला त्यांच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. लुटालुट तुम्ही करायची. ही देशाला खड्डयात घालणारी नीती आहे. धार्मिक प्रचार आम्ही करत नाही. तुम्ही जे करत आहात ते देशाला खड्ड्यात घालणारं आहे. यांनी अरविंद केजरीवाल हेमंत सोरेन यांना अटक केली. मात्र पलिकडच्या खासदार ताईंवरची चौकशी का थांबली. मोदीजी तुम्ही भ्रष्टाचार म्हणून ओरडत फिरता. त्या गद्दार ताईंनी तुम्हाला राखी बांधली. तुमच्या हातातली राखी तुम्हाला भ्रष्चाराचा आरसा दाखवतोय. प्रफुल पटेलांवर दाऊच्या हस्तकासोबत व्यवहार केल्याचे आरोप केले. मात्र तुमच्याकडे आल्यावर क्लिनचीट दिली. मिरचीसोबत व्यवहार केलेला प्रफुल पटेलांना तुम्ही मिठी मारतायत. पंतप्रधानांनाच खरा चेहरा कोणता तेच कळत नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.