दादरचे कीर्ती महाविद्यालय भाजपला आंदण

नवमतदार नोंदणी अभियानासाठी दादर येथील कीर्ती महाविद्यालय भाजपला आंदण दिल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने केला आहे. 25 जानेवारी रोजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात बॅनरबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखवून नवमतदार नोंदणीचे काम करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पह्टो आणि व्हिडीओ उपलब्ध असून युवासेनेने याची तक्रार मुंबई विद्यापीठाकडेदेखील केली आहे.

भाजपच्या झेंडय़ाखाली कीर्ती महाविद्यालयात सुरू असलेल्या नवमतदार नोंदणी अभियानाची माहिती मिळताच युवासेना आणि माहीम विधानसभा पदाधिकारी यांनी प्राचार्य डॉ. डी. व्ही. पवार यांच्या दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ न शकल्याने युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांच्या सोबत युवासेना माहीम विधानसभा पदाधिकारी अमोल लोंढे, स्वप्नील सूर्यवंशी, साईराज भोईर, सिद्धार्थ शिवलकर, सुशांत गोजारे यांनी प्राचार्य पवार यांना निवेदन देऊन भाजप पक्षाला पॅम्पसमध्ये प्रचाराची मुभा मिळत असेल तर इतर सर्व राजकीय पक्षांनादेखील महाविद्यालयाच्या आत समाजप्रबोधन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

नवमतदार नोंदणी निःपक्ष हवी
कीर्ती महाविद्यालयाची संस्था ही भाजपची मुख्य संघ परिवार यांची आहे. परंतु महाविद्यालयातील विद्यार्थी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नसतात. त्यामुळे फक्त मतदार नोंदणी हे जनजागृतीचे काम करायचे असेल तर ते निःपक्ष होणे अपेक्षित आहे. भाजपसह अनेक राजकीय पक्ष हे समाज प्रबोधनाचे काम आपापल्या विभागात करत असतात. यापुढे आपले महाविद्यालय राजकीय पक्षांना देणार असाल तर आमच्यासारख्या इतर पक्षांनादेखील परवानगी देण्यात यावी, अशी उपरोधी मागणीही सावंत यांनी केली.