बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा सांगता मग शिवसेना का सोडली? उलट तपासणीत लांडे गडबडले

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, त्यांची शिकवण आणि वारसा सांगता मग शिवसेनाप्रमुख हयात असताना शिवसेना का सोडली, असा थेट सवाल शिवसेनेचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना केला. त्यावर मात्र लांडे यांची बोलतीच बंद झाली आणि मला यावर काही बोलायचे नाही, असे मान खाली घालत त्यांनी सांगितले.

आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांची आजपासून उलट तपासणी सुरू झाली. या सुनावणीच्या पहिल्या दिवशी दिलीप लांडे यांची उलट तपासणी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुमारे साडेपाच तास चाललेल्या सुनावणीत कामत यांनी दिलीप लांडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा ते पुरते गडबडून गेले. उलट तपासणीत लांडे यांना पन्नास प्रश्न विचारण्यात आले.

2005 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना आपण शिवसेना का सोडली? असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केला. त्यावर शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेत होतो, असे उत्तर दिलीप लांडे यांनी दिले. त्यावर मनसेमध्ये प्रवेश करून त्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती का? असा प्रश्न विचारला. त्यावर मनसेमधून निवडणूक लढवल्याचे त्यांनी मान्य केले.

हा तर ट्रेलर
उलट तपासणीत सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नावर दिलीप लांडे सतत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व व त्यांची विचारधारा असेच उत्तर फिरवून फिरवून देत होते. विचारलेल्या प्रश्नांना बगल देत होते. त्यावर देवदत्त कामत संतप्त झाले. तुम्ही प्रश्नाचे थेट उत्तर द्या. हा तर फक्त ट्रेलर आहे. अजून उलट तपासणीला पूर्णपणे सुरवातही केलेली नाही, असे देवदत्त कामत यांनी सुनावले.

एकनाथ शिंदेंना साक्षीला बोलवा
महाविकास आघाडी स्थापन होत असताना आपण आघाडीला विरोध केला ही चुकीची माहिती आपण सांगत आहात. कारण त्याची नोंद कोणत्याही रेकॉर्डवर नाही, असा प्रश्न कामत यांनी केला. त्यावर महाविकास आघाडी सरकारला विरोध करणारे मत माझ्या पक्षातील नेत्यांसमोर व्यक्त केले होते. त्यांना तुम्ही साक्षीला बोलावू शकतात, असे लांडे यांनी शिंदे यांचे नाव न घेता सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागणार – राहुल नार्वेकर
आमदार अपात्रतेवरील सुनावणीला अधिक वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाल्यास सर्वोच्च न्यायालयाला कळवले जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.