पक्षातल्या लोकांनी केलेले आरोप स्वच्छ करणारे नवे मशीन भाजपकडे आले का? संजय राऊत यांचा टोला

महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. कार्यकर्त्यांच्या भावनेचा पक्षाने आदर राखला पाहिजे. मात्र, त्यांना योग्यप्रकारे समजवले पाहिजे. सांगली, भिवंडी यासह प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या आपल्या पक्षाबाबत भावना असतात, त्या समजून घेत त्यांना प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रोत्साहन द्यावे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सांगलीत महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकत्र काम करणार असून आमचाच विजय होणार आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. तसेच गिरीष महाजन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांना आव्हानही दिले.

प्रत्येक जागा आपल्या पक्षाने लढवायला हवी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. ही आपली जागा आहे, ती आपल्याच पक्षाने लढवली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना असते. मात्र, अशावेळी पक्षातील वरिष्ठांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना मुख्य प्रवाहात आणून प्रचारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असते. तेच सांगली आणि भिवंडीत होईल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मैत्रीपूर्ण लढती हा पर्याय होऊ शकत नाही, सांगलीत होतील, तर राज्यात आणि देशात मैत्रीपूर्ण लढती का नको, ते कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे जेव्हा एका विचारधारेने पक्ष एकत्र येतात, त्यावेळी चर्चेतून मार्ग काढणे गरजेचे असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. येत्या एकदोन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

जळगाव येथील जागा शिवसेना तधीच लढत नव्हती, गिरीष महाजन यांना त्यांची जागा दाखवण्यासाठीच या जागेवर आम्ही उमेदवार दिला आहे. आता त्यांनी जळगावची जागा जिंकून दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. त्यामुळे तेच स्वतः मुंगेरीलाल आहेत. त्यांनी आधी जळगाव जिंकून दाखवावे, त्यानंतर आरोप करावेत, असेही राऊत यांनी खडसावले.

पक्षातल्याच लोकांनी एकमेकांवर केलेले आरोप धुवून काढायचे नवे वॉशिंग मशीन भाजपात आले आहे काय, असा सवाल करत त्यांनी भाजपला टोला लगावला. एकनाथ खडसे यांच्या भाजपातील प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला. भाजपने खडसे यांच्यावर केलेले आरोप आणि खडसे यांनी फडणवीस, महाजन यासारख्या नेत्यांवर केलेले आरोप यांचे स्मरण जनतेला होईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र प्रचार करणार आहेत. आम्ही एकत्र असून भाजपच्या विकृतीच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बेळगाव आणि सीमाभागात निवडणूक लढायला हवी, असे आपले मत आहे. तिथे मराठी माणसांची एकजूट आहे, ती कायम राहायला हवी. महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्यासाठी भाजपकडून नेहमी कारस्थान सुरू असते.अशावेळी सीमाभागातील मराठी माणसांसाठी निवडणूक लढण्याची गरज आहे. सांगली, कोल्हापूर, हातकणंगले येथील कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक होणार आहे. त्यासाठी चंद्रहार पाटील आपल्यासोबत मुंबईत येत आहेत. या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराचे मार्गदर्शन करत रणनीती ठरवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.