जगभरातून थोडक्यात आणि सुटसुटीत बातम्या

प्रीती परत येतेय!
अभिनेत्री प्रीती झिंटा लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार असून ती सहा वर्षांनंतर चित्रपटात दिसणार आहे. ‘लाहोर 1947’ या चित्रपटात ती सध्या काम करत आहे. तिने नुकतेच चित्रपटाच्या सेटवरील फोटोज शेअर केले आहेत. या पह्टोमध्ये प्रीती तिच्या चित्रपटातील टीमसोबत दिसत असून या फोटोंना तिने ‘लाहोर 1947 च्या सेटवर’ असे
पॅप्शन दिले आहे. प्रीती सध्या लॉस एंजेलीसमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहतेय.

बुलेटप्रूफ जॅकेट
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले. पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटपासून बनवलेल्या या जॅकेटमधून 6 स्नायपर बुलेटही आत प्रवेश करू शकल्या नाहीत, इतके ते मजबूत आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. हे जॅकेट कानपूरच्या डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने विकसित केले आहे.

अमेरिकेची मदत
युव्रेन आणि इस्रायलला मदत करण्यासाठी अमेरिकेचे संसद सभागृह सीनेटने 95 अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजुरी दिली. सभागृहात 79 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. तर 18 सदस्यांनी विरोधात मतदान केले. याआधी हे विधेयक अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस्मध्ये हे विधेयक पास झाले होते. युव्रेन, इस्रायल आणि तायवानसाठी 95 अब्ज डॉलरची मदत करण्यात येणार आहे.

अथेन्सला पिवळ्या, नारंगी धुळीचा वेढा
ग्रीसची राजधानी अथेन्सला पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या धुळीने वेढा घातला. त्यामुळे सर्वत्र एक वेगळेच दृश्य दिसत आहे. उत्तरी आफ्रिकेहून भूमध्य सागराकडून आलेल्या या धुळीने आकाशाला पूर्णपणे व्यापून टाकले आहे. त्यामुळे ग्रीकची राजधानी जणू पह्टोग्राफीसाठी एक फिल्टरचा वापर करण्यासाठी सज्ज झाले आहे, असे दिसत आहे. हे जबरदस्त दृश्य सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले आहे.

अमेरिकेत गाझा समर्थकांचा हल्ला
इस्रायल-हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आणि गाझामध्ये उद्भवलेले मानवीय संकटामुळे अमेरिकेत जोरदार आंदोलन केले जात आहेत. फिलिस्तीन समर्थक विद्यार्थी लागोपाठ आंदोलन करत आहेत. अमेरिकेतील अनेक भागांत आंदोलन करण्यात आल्यानंतर फिलिस्तिनी समर्थक आणि विरोधामुळे तणाव वाढला आहे. यामुळे अनेकांना
अटक करण्यात आली आहे. तसेच क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.

प्रियंवदा नटराजनचा ‘टाइम’कडून गौरव
खगोल वैज्ञानिक प्रियंवदा नटराजन यांचा ‘टाइम’ मॅगझिन 2024 च्या सर्वात प्रभावशाली 100 जणांच्या यादीत समावेश करण्यात आला. 100 जणांच्या यादीत नाव आल्याचा मेल जेव्हा मी पाहिला त्यावेळी मला विश्वास बसला नाही. मला वाटले, हा मेल स्पॅम मेल होता, असे प्रियंवदा नटराजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. मी एक शास्त्रज्ञ आहे. त्यामुळे माझे नाव या यादीत येईल, असे मला अजिबात अपेक्षित नव्हते, असे त्या म्हणाल्या.

टेस्लाला अखेर ब्रेक
एलन मस्क यांची कंपनी टेस्लाने तिमाहीची आकडेवारी जारी केली. यात कंपनीच्या मिळकतीत 55 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2020 नंतर पहिल्यांदा कंपनीच्या मिळकतीत घसरण झाली आहे. मार्च संपल्यानंतर पहिल्या तिमाहीत टेस्लाचे नेट प्रॉफिट म्हणजे शुद्ध नफा 55 टक्क्यांनी घसरून 1.13 बिलियन डॉलरवर आला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत नफा 2.51 बिलियन डॉलरवर होता.

‘टिकटॉक’वर बंदी
चिनी अॅप ‘टिकटॉक’वरील बंदीचे विधेयक अमेरिकेच्या सीनेटमध्ये मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 79 मते पडली तर विरोधात केवळ 18 मते पडली. टिकटॉक अॅप बंदीसाठी आता केवळ राष्ट्रपती जो बायडेन यांची स्वाक्षरी बाकी आहे. यानंतर कंपनीला स्वतःहून हे अॅप मागे घ्यावे लागेल. अन्यथा टिकटॉक अॅपवर अमेरिकेत बंदी घातली जाईल.

दहा अॅनाकोंडा जप्त
बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या सुटकेसमधून दहा अॅनाकोंडा साप जप्त करण्यात आल्याची घटना बंगळुरू विमानतळावर घडली. हे अॅनाकोंडा पिवळय़ा रंगाचे असून ते अत्यंत मौल्यवान मानले जातात. प्रवाशाच्या साहित्याची तपासणी करताना त्याच्या सुटकेसमध्ये साप आढळून आले. त्यानंतर सदर प्रवाशाला वन्यजीवांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

विमान कोसळले
अमेरिकेतील अलास्का येथे एका गोठलेल्या नदीवर इंधन वाहून नेणारे विमान कोसळले. डग्लस सी-54 विमानात दोन जण होते. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याची भीती आहे. नदीकाठावरील एका टेकडीजवळ विमान कोसळल्यानंतर आग लागली.