‘प्रिन्स’ शुभमन पडला ‘किंग’ कोहलीवर भारी, IPL मध्ये ‘हा’ विक्रम करणारा एकमेव खेळाडू

गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल याने 10 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या लढतीत एक मैलाचा दगड पार केला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये शुभमनने 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वात कमी वयामध्ये इथपर्यंत पोहोचणारा शुभमन पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली याचा विक्रम मोडला आहे.

बुधवारी राजस्थानविरुद्ध झालेला सामना गुजरातने अखेरच्या चेंडूवर जिंकला. गुजरातच्या विजयामध्ये कर्णधार शुभमनने अर्धशतकीय योगदान दिले. त्याने साई सुदर्शनच्या मदतीने संघाला 64 धावांची सलामी दिली. त्यानंतर एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असताना गिलने मैदानात नांगर टाकला आणि अर्धशतक ठोकले. बाद होण्यापूर्वी त्याने 44 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमधील 3 हजार धावाही पूर्ण केल्या.

शुभमन गिल याने सर्वात कमी (24 वर्ष 215 दिवस) वयात 3 हजार धावा केल्या आहेत. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहली याचा विक्रम मोडला. विराट कोहलीने हा टप्पा गाठण्यासाठी 26 वर्ष 186 दिवस घेतले होते. या यादीमध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (26 वर्ष 320 दिवस) तिसऱ्या, सुरेश रैना (27 वर्ष 161 दिवस) चौथ्या आणि रोहित शर्मा (27 वर्ष 343 दिवसो) पाचव्या स्थानावर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 3 हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही गिलने स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर क्रिस गेल असून त्याने 75 डावांमध्ये हा टप्पा ओलांडला होता.

सर्वात कमी डावात 3 हजार धावा करणारे खेळाडू

75 – क्रिस गेल
80 – केएल राहुल
85 – जोस बटलर
94 – शुभमन गिल
94 – डेव्हिड वॉर्नर
94 – फाफ डु प्लेसिस