पुढील वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

विद्यापीठ, महाविद्यालयांना शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

पुढील शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ, महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जुहू येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी चर्चासत्रात पाटील बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या  कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी गठीत सुकाणू समितीचे सदस्य, शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुलजी कोठारी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्क (NCrF) स्वीकारून 2023-24 पासून अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 200  स्वायत्त महाविद्यालय आणि  1700 पदवीत्तर सेंटरचा समावेश आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व महाविद्यालयांत धोरणाची अंमलबजावणी करावीच लागेल, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.