परिवर्तनासाठी समाजवादीचा ‘इंडिया’ला भक्कम पाठिंबा; वंचित बहुजन, शेतकरी आणि कष्टकऱयांची एकजूट

सत्ताधारी भाजपच्या हुकूमशाहीविरोधात  स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला देशभरातील विविध पक्षांकडून जाहीर पाठिंबा मिळत असताना आता समाजवादीही इंडियासोबत  आले आहेत. जनता परिवारातील विविध पक्ष आणि संघटनांचे ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या पुणे येथे झालेल्या मेळाव्यात इंडियाला पाठिंबा देण्याचा निर्णय एकजुटीने घेण्यात आला. भूतकाळात झालेल्या चुका, मतभेद, मनभेद विसरून इंडियाला पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

समाजवादी जनता परिवारातील विविध पक्ष आणि संघटनांचा जाहीर मेळावा नुकताच पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन येथे पार पडला. यासाठी जनता दल (युनायटेडचे) महासचिव आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला होता. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या प्रयत्नाने झालेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीचे महाराष्ट्रातील सर्वच समाजवाद्यांनी यावेळी स्वागत करीत पाठिंबा दिला. जनता दल (सेक्युलर)चे प्रदेश अध्यक्ष शरद पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीदेखील या बैठकीला समर्थन दिले. यावेळी समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा, डॉ. अभिजित वैद्य, गंगाधर पटने, निहाल अहमद, अजमल खान, नितीन वैद्य, शशांक राव, अतुल देशमुख, लोकशाहीर संभाजी भगत, प्रभाकर नारकर, सच्चिदानंद शेट्टी, मलविंदरसिंह खुराणा, आदिवासी नेते काळूराम काका धोदडे, शब्बीर अन्सारी, सुभाष वारे, ज्येष्ठ कामगार नेते असीम रॉय यांच्यासह समाजवादी जनता परिवारातील पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

राज्यातील प्रश्नांबाबत सरकार बेफिकीर

महाराष्ट्रात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, महापुरुषांची होणारी बदनामी, अल्पसंख्याक समुदायांवर होणारे हल्ले, कष्टकऱयांना देशोधडीला लावणारे माथाडी बिल, बेरोजगारी आणि नोकर भरतीचे कंत्राटीकरणाबद्दल समाजवादी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

म्हणूनच महाविकास आघाडीसोबत

महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी राज्यातील वंचित बहुजन, शेतकरी आणि कष्टकरी या तिन्ही शक्तींना सोबत घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी राजकीय ठरावादरम्यान व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्रात ओबीसींसह जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, समाजवाद्यांच्या या मेळाव्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे लवकरच नागपूर, संभाजीनगर, नाशिक, कोकण आणि मुंबईत असे मेळावे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती संयोजक राजा कांदळकर यांनी दिली.