सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहारसह पत्नी, मुलावर गुन्हा दाखल; 5 कोटी 85 लाख 85 हजारांची अवैध मालमत्ता जमविली

25 हजारांची लाच घेणारे सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची कोटय़वधी रुपयांची मालमत्ता अवैध उघडकीस आली असून, लोहारसह त्यांची पत्नी सुजाता व मुलगा निखिल यांच्यावरही सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच व अवैध संपत्तीप्रकरणी अधिकारी व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील डिसले यांनी परदेशातील शिक्षणासाठी मागितलेली रजा व त्यांच्याविरुद्ध सादर केलेला अहवाल यामुळे ते चर्चेत होते.

करवीर तालुक्यातील पाचगाव येथे राहणारे किरण लोहार हे सोलापूरचे शिक्षणाधिकारी असताना 31 ऑक्टोबर 2022 रोजी एका संस्थाचालकाकडून 25 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांनी नोव्हेंबर 1993 ते ऑक्टोबर 2022 या नऊ वर्षांत भ्रष्ट व अवैध मार्गाने 5 कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांची अवैध मालमत्ता जमविली आहे. यात त्यांची पत्नी सुजाता व मुलगा निखिलही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

विष्णू कांबळे कुटुंबीयांविरुद्धही गुन्हा दाखल

बार्शीचे महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी प्रशासनाधिकारी व सांगलीचे तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (59) आणि त्यांची पत्नी जयश्री कांबळे यांच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कांबळे यांच्याकडे सुमारे 83 लाख रुपये किमतीची मालमत्ता सापडली.