बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी सौरव यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. कोलकातातील वुडलँड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तीन डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवत होते. त्यांचे कोरोनाचे नमुने जिनेम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्यात त्यांना ओमायक्रॉनची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रुग्णालयात दाखल झाल्यावर सौवर यांच्यावर अँटीबॉडी कॉकटेल थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. 2021 हे वर्ष सौरव यांना प्रकृतीच्यादृष्टीने चांगले गेले नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना हृदयविकाराचा त्रआस जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.

आता कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते काही दिवस घरातच विलगीकरणात राहणार आहेत. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.