‘अर्ध आयुष्य शिक्षण घेण्यात गेलं, पण…’, बेरोजगारीला कंटाळून तरुणाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

देशभरात दिवसेंदिवस बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे. नागरिकांचं कंबरडं मोडणाऱ्या या महागाईमुळे तसेच शिक्षण घेऊनही नोकरी नसल्यामुळे अनेक तरुण टोकाचं पाऊल उचलू लागले आहेत. उत्तर प्रदेशच्या कनौज येथे अशीच एक भयंकर घटना घडली आहे. येथे नोकरी मिळत नसल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःची शैक्षणिक कागदपत्रे आणि पदवी जाळून टाकली. तसेच आपल्या वडिलांना त्याने एक चिठ्ठी देखील लिहिली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ब्रिजेश पाल (28) असे त्य़ा तरुणाचे नाव आहे. ब्रिजेशने घरीच गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली आहे. “मी माझ्या आई-वडिलांचा विश्वास कमावू शकलो नाही. माझ्या निधनानंतर कुणालाही त्रास देऊ नका. माझ्या मृत्युसाठी मीच जबाबदार आहे. मला आता जगण्याची उमेद राहिली नाही. मला काहीच अडचणी नाही. मला तुम्ही माफ कराल, अशी आशा करतो. माझा आज शेवटचा दिवस आहे. मी आईबरोबर जेवण घेतलं. आज मी माझ्या आई-वडिलांचा विश्वासघात करत आहे. माझ्या जाण्यानंतर वडिलांची काळजी घ्या, आपली इथपर्यंतच सोबत होती. मी आता या जगात नसताना माझी बहीण संगीताचा विवाह योग्य पद्धतीने करा”, असेही ब्रिजेशने चिठ्ठीत लिहिले.

ब्रिजेशने त्या चिठ्ठीत त्याच्या बी.एससी पदवीशी निगडित सर्व कागदपत्रे जाळून टाकल्याचे सांगितले आहे. जर उच्च शिक्षण घेऊन नोकरीच मिळणार नसेल तर संपूर्ण आयुष्य शिक्षण घेण्यात का घालवायचे? माझे अर्धे आयुष्य शिक्षण घेण्यातच गेले. मी आता हे सगळ इथेच थांबवत आहे. अशी खंत त्याने पत्राद्वारे मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिजेशने नुकतीच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र पेपरफुटी प्रकरणामुळे तो नाराज होता.

ब्रिजेश पालच्या आत्महत्येनंतर राजकारणातील अनेक नेत्यांनी खंत व्यक्त केली असून सोशल मीडियाद्वारे भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. पेपरफुटीची प्रकरणं दररोज समोर येतायत, सरकारी पदे भरली जात नाहीएत, हजारो बेरोजगार तरूण रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत, खाजगी क्षेत्रात नोकरकपात केली जातेय आणि हताश झालेली मंडळी शिक्षण किंवा नोकरीचं कारण देऊन देश सोडून जातायत. ‘मोदींची गॅरंटी’ यांना लागू होत नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला आहे.

तर भाजपाच्या राज्यात बेरोजगारी फोफावली असल्यामुळे तरूणांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याची टीका त्यांनी केली. अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.