अद्याप संपर्क नाही… चांद्रयान-3 चे काय होणार?

चंद्र मोहिमेवर गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क करूनही संपर्क होत नाहीये. 20 सप्टेंबर 2023 ला लँडिंग पॉइंट म्हणजेच शिवशक्ती पॉइंटवर सूर्यप्रकाश पडला होता, परंतु विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमधून बाहेर न आल्याने चांद्रयान-3 मिशन संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चांद्रयान-3 ला 14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून लाँच करण्यात आले होते. 23 ऑगस्टला इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या साऊथ पोलवर लँडिंग करून इतिहास रचला होता.

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने 22 सप्टेंबर 2023 रोजी विक्रम लँडरला संदेश पाठवला, परंतु त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पुढील काही दिवस संदेश पाठवले जाणार आहेत. इस्रोने यशस्वीपणे विक्रमची लँडिंग केली. प्रज्ञान रोव्हरला 105 मीटरपर्यंत चालवले.

दक्षिण ध्रुवावर पोहोचलेले हे जगातील पहिले मिशन आहे, तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा हिंदुस्थान जगातील चौथा देश ठरला आहे. चंद्राच्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी विक्रम आणि प्रज्ञानला स्लीप मोडमध्ये टाकले होते.

जागे होण्याची आशा

विक्रम लँडरला ज्या वेळी स्लीप मोडमध्ये टाकले त्या वेळी एका सर्किटला जागे राहण्याचे निर्देश दिले होते. 22 सप्टेंबरपासून याच्याशी लागोपाठ संपर्क केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, काळजी करण्याची गरज नाही. अद्याप ते जागे होण्याची आशा आहे, असे इस्रो चिफ एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे.