सुमित बाबामुळे ‘ठाण्याची दिशा’ भरकटली! अंकगणित आणि वास्तुविशारद बाबाने केले ठाण्यात अनेक बदल

मिंधे सरकार सत्तेत आल्यानंतर ठाण्यात अचानक सुमित बाबा नावाच्या एका बाबाची एण्ट्री झाली आहे. ठाण्यातील रस्त्यांवर कोणते बदल करायचे, कोणता रंग कुठे वापरायचा, रस्त्यावरील वाहने कोणत्या मार्गाने सोडायची, शहरातील पार्किंगमध्ये कोणता बदल करायचा हे सगळे हाच सुमित नावाचा बाबा ठरवत असल्याची जोरदार चर्चा ठाण्यात आहे. या बाबाने शहरातील यू टर्न बंद केले तर काही रस्त्यांवर दुभाजक टाकले असून ‘ठाण्याची ‘दिशा’च या बाबाने भरकटवली आहे. अंकगणित तज्ञ आणि वास्तुविशारद असे म्हणवणाऱ्या बाबाने ठाण्यात अनेक बदल केले आहेत. हा बाबा नुसतेच बदल ठरवत नाही, तर शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तशा सूचनाही देतो. त्यामुळे या बाबाची दहशत सध्या ठाण्याचे पोलीस आणि वाहतूक विभागात आहे.

राज्यात मिंध्यांचे बेकायदेशीर सरकार स्थापन झाल्यापासून नवनवीन बाबा, बुवा, महाराज उदयास आलेले पाहायला मिळत असतानाच ठाण्यात सुमित बाबा नावाच्या एका बाबाने बस्तान ठोकले आहे. ठाणे शहराला कुणाचीही नजर लागू नये, कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी सुमित बाबाने शहरात अनेक बदल केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर दुभाजक टाकून त्याने यू टर्न बंद करून टाकले आहेत. ठाण्याच्या वाहतुकीला कसे वळवायचे, रंगरंगोटी कशी करायची हेही हा सुमित बाबाच ठरवत असल्याने कोण हा सुमित बाबा, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. या बाबाला बघण्याची आणि त्याचे आशीर्वाद घेण्याची इच्छा अनेक राजकारण्यांनी व्यक्त केली आहे. या सुमित बाबाची प्रशासनावर चांगलीच पकड असून ‘सुमित बाबा बोले.. आणि वाहतूक विभाग चाले’ अशी परिस्थिती आहे. या सुमित बाबाचा हात बडय़ा राजकीय नेत्यांवर तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांवर असल्याचे बोलले जाते. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभारात या बाबाची लुडबुड असल्याने वरिष्ठ अधिकारी अक्षरशः हैराण झाले आहेत. या बाबाचे दर्शन कधी होईल याकडे अनेकांचे डोळे लागून राहिले आहेत.

शहरात हे विचित्र बदल
उथळसरच्या अरुंद रस्त्यावर दुभाजक टाकले.
कापूरबावडी येथे कोलशेतकडे जाणारा मार्गच बंद केला.
घोडबंदर रोडवरील विद्यापीठ यू टर्न बंद केल्याने मानपाडा परिसर वाहतूककोंडीत.
ब्रह्मांड सिग्नल कायमचा बंद केला.
गोखले रोडवर दुभाजक टाकले, त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला.
मल्हार सिनेमा सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली.
आराधना बंद करण्याच्या मार्गावर, त्यामुळे हरिनिवास, खाऊ गल्लीत वाहतूककोंडी
भिवंडी-नाशिकवरून येणारी जड वाहने पॅडबरी जंक्शनवरून घोडबंदरकडे.
पोखरण रोड 2 वर बेथनीजवळील चौक बंद करून चढण रस्त्यावर सोय.

जितेंद्र आव्हाडांना हवे बाबाचे दर्शन!
सुमित बाबाचा फोन पोलीस आयुक्त किंवा पालिका आयुक्त यांना गेला की लगेच कामे होतात, अशी टीका अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याचबरोबर हिरानंदानी येथे राहणाऱ्या या बाबाला सहा बेडरूमचा फ्लॅट मिळाला असून, मला पण या बाबाचा आशीर्वाद हवा आहे, असे आव्हाड मिश्कीलपणे म्हणाले होते.