चुनाभट्टी हत्या प्रकरण – वर्चस्वाच्या लढाईतून झाला गोळीबार

दोन गटांतील वर्चस्वाच्या लढाईतून चुनाभट्टीच्या आझादनगर येथे गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. गोळीबारप्रकरणी आरोपीना अवघ्या आठ तासांत चुनाभट्टी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. सागर सावंत, सनील ऊर्फ सन्नी पाटील, नरेंद्र ऊर्फ नऱ्या पाटील, आशुतोष ऊर्फ बाबू देविदास गावंड अशी त्यांची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी आशुतोष हा उत्तर प्रदेशला गेला होता. त्याने गोळीबारासाठी तेथून शस्त्र आणल्याचे तपासात समोर आले आहे.

रविवारी चुनाभट्टी येथे दिवसाढवळय़ा गोळीबार झाला होता. गोळीबारात गुंड सुमित येरुणकरचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. गोळीबारप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासासाठी नउै पथके तयार केली. वरिष्ठ निरीक्षक अंकुश गायकवाड यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक काटे, ठुबल, सहाय्यक निरीक्षक नवनाथ काळे, सरडे, पाटील, मोरे, प्रवीण राक्षे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. गोळीबार हा वर्चस्वाच्या लढाईतून झाल्याचे समोर आले. मारेकरी हे नवी मुंबई परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या चौघांना कामोठे येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुमित येरुणकर आणि सनील हे पूर्वी चुनाभट्टी येथे एकत्र गँग चालवत असायचे. 2016 मध्ये सुमित आणि त्याच्या चार साथीदारांनी एका विकासकावर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात सुमितला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. सुमितवर ‘मोक्का’ अन्वये कारवाई केली होती. सुमित हा तुरुंगात असतानाच सनीलने स्वतःची गँग सुरू केली. चुनाभट्टी परिसरात माथाडी, नव्याने सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामधून तो पैसे कमावू लागला. सुमित जेव्हा पॅरोलवर बाहेर आला तेव्हा सनील आणि सुमितमध्ये गँगच्या वर्चस्वाच्या लढाईतून वाद झाला. घटनेच्या काही दिवस अगोदर त्यांच्यात हद्दीचा वाद झाला होता. त्या भांडणावरून सनीलच्या टोळीने सुमितची हत्या करण्याचे ठरवले. फायरिंगसाठी शस्त्र लागणार असल्याने आशुतोष हा उत्तर प्रदेश येथे गेला. तेथून तो शस्त्र घेऊन आला होता. सुमितच्या हत्येसाठी त्याने कट रचला. रविवारी सुमित हा चुनाभट्टी परिसरात दिसताच या टोळीने गोळीबार केला अशी माहिती तपासात समोर आली आहे.