धनगर समाजाला धक्का, एसटी प्रवर्गातून आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जात होती. मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर धनगर समाजाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळली आहे.

सध्या धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून आरक्षण आहे. तर बाहेरील राज्यात धनगड समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, इंग्रजीत उच्चार करताना डीचा उच्चार आर असा करण्यात येतो. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करत धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच धनगर समाज हा भटकंती करणारा समाज आहे. धनगड आणि धनगर समाजाच्या चाली रिती, परंपरा आणि संस्कृती समान असल्याचे धनगर समाजाकडून सांगण्यात येत आहे. त्याचा संदर्भ देत राज्यात धनगर समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते.