भ्रष्टाचारी नेते भाजपत आल्यावर शुद्ध कसे होतात? तेजस्वी यादव यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, अशातच विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी यांच्या पूर्णियामध्ये होणाऱ्या प्रचारापूर्वी तेजस्वी यांनी दहा मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. यात त्यांनी काही रिपोर्टचा हवाला देत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तेजस्वी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहीले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये निवडणुक प्रचारासाठी येणार आहेत. ते 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. आशा करतो की, ते निःपक्षपाती असतील आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतील. तेजस्वी यांनी भाजपला प्रश्न विचारला की, जर एखादा नेता विरोधी पक्षात असेल तर तो भ्रष्ट असतो, पण भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो इमानदार होतो. यासोबतच तेजस्वी यांनी काही नेत्यांची नावे घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 23 नेत्यांवरही निशाणा साधला. तेजस्वी यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, रेड्डी ब्रदर्स, हेमंता विश्व शर्मा, मुकुल रॉय, नारायण राणे, अशोक चव्हाण, शुभेंदू अधिकारी इत्यादींविरोधात सुरू असलेल्या तपासाचा संदर्भ दिला. अशा प्रकारे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 23 नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले.

यासोबतच तेजस्वी यांनी बिहारमधील नितीश कुमार यांच्या जेडीयू सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, भाजप विरोधात असताना जेडीयू नेते नितीश कुमार यांच्या सरकारवर 33 घोटाळ्यांचे आरोप करायचे. जेडीयू-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर या घोटाळ्यांची चौकशी का झाली नाही, असा सवाल तेजस्वी यांनी केला. या घोटाळ्यांबाबत काही आठवत नसेल तर तो जुने व्हिडिओ शेअर करू शकतो, असेही त्याने म्हटले आहे. याशिवाय तेजस्वी यांनी आपल्या पोस्टमध्ये एनसीआरबीच्या अहवालाचाही हवाला दिला आहे. ते म्हणाले की, 1990 ते 2005 आणि 2005 ते 2023 या कालावधीत बिहारमधील विविध गुन्ह्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. भाजप सरकार 15 वर्षांपासून सत्तेत आहे, गुन्हेगारीच्या बाबतीत तथाकथित ‘जंगलराज’वर काय बोलणार? याशिवाय तेजस्वी यांनी निवडणूक रोखे, रोजगार, नोकऱ्या आणि बिहारला विशेष दर्जा देण्यावरूनही भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे.