ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाज, मिंधे गट, भाजपचे पदाधिकारी शिवसेनेत; उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत

ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील आदिवासी म. ठाकूर समाज, भाजप आणि मिंधे गटाच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळय़ात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. यावेळी आदिवासी म. ठाकूर संघटनेचे जानू हिरवे यांच्यासह मिंधे गटाचे माजी पंचायत समिती सभापती यशोदा आवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य तुळशी गिरा, धावन तेलम, माजी पंचायत समिती सदस्य राजेश कामडी, तळवाडा ग्रामपंचायत सरपंच अंकुश बरतड, भावसे ग्रामपंचायत सरपंच अशोक भुसारे, कसारा विभागप्रमुख भास्कर पारधी, आदिवासी संघटनेचे शहापूर तालुकाध्यक्ष जनार्दन वीर, संपर्कप्रमुख झिपा वीर यांच्यासह मिंधे गटातील विविध ग्रामपंचायतीचे अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भिवंडी तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य व आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव, नंदकिशोर लहाने, बळीराम केशव, जान्हवी मढवी यांनी आपल्या असंख्य सहकाऱयांसोबत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेत्या ज्योती ठाकरे, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांसह शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे गणेश राऊत, भाई देहेरकर, मिलिंद देशमुख, रश्मी निमसे, गुलाब भेरे, रवींद्र लकडे, सुरेंद्र तेलवणे, गणेश अवसरे, अविनाश शिंगे, स्वानंद शेलवले, शरद मोगरे आदी उपस्थित होते.