झवेरी बाजारातील सोने तस्करीचा डीआरआयने केला पर्दाफाश 

महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय) दक्षिण मुंबईतील झव्हेरी बाजारात कारवाई केली. आफ्रिकेतून आणलेल्या सोन्यावर विदेशी खुणा काढून ते वितळवून त्याची विक्री केली जात होती. डीआरआयने 9. 67 किलो सोने, 18.48 किलो चांदी, 1.92 कोटी आणि 10.48 कोटीचे परदेशी चलन जप्त केले आहे. आफ्रिका ते मुंबईपर्यंत सोने आणण्यासाठी पॅरिअरला (वाहक) पैशांचे आमिष दिले जात होते.

काही आफ्रिकन नागरिक हे सोने तस्करी करत असल्याची माहिती मुंबई डीआरआय युनिटला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. तपासादरम्यान डीआरआयने एकाला ताब्यात घेतले. सोने तस्करीसाठी पॅरिअरची नियुक्ती करतो तो पॅरिअर असलेल्या आफ्रिकन नागरिकांकडून ते सोने घेतो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करतो. ते सोने एका खरेदीदाराला दिले जाते. डीआरआयचे पथक भरती करणाऱयाच्या कार्यालयात गेले. तेथून 10.48 कोटीचे परदेशी चलन जप्त केले. सोने खरेदी करणाऱयाने ते पैसे अॅडव्हान्स म्हणून एकाकडे दिले होते. त्यानंतर डीआरआयचे पथक ते सोने खरेदी करणाऱयाच्या कार्यालयातदेखील गेले. डीआरआयचे पथक येण्यापूर्वीच तो तेथून पळून गेला. त्या कार्यालयातून 351 ग्रॅम विदेशी सोन्याचे तुकडे, 1818 ग्रॅम चांदी आणि 1.92 कोटी रुपये जप्त केले.

डीआरआयला तपासादरम्यान आणखी माहिती मिळाली. ज्याच्याकडून सोने गोळा केले होते, ते दोघे झव्हेरी बाजारातील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजते. डीआरआयचे पथक त्या हॉटेलमध्ये गेले. तेथून दोन आफ्रिकन नागरिकांना डीआरआयने अटक केली. सोन्याची तस्करी आणि पॅरिअरची भरती करण्याचे ते काम करत असायचे. सोने तस्करीप्रकरणी डीआरआयने एकूण चार जणांना (पॅरिअर आणि सोने वितळवणारे) अटक केली. त्याने हिंदुस्थानात सोन्याच्या तस्करीत सक्रिय असल्याची कबुली दिली. त्या चौघांविरोधात सीमा शुल्क कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक केली. त्या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.