राज्यात राजकीय पक्ष चोरणारी टोळी मोकाट; जयंत पाटील यांचा टोला

देशाच्या इतिहासात संस्थापक आहेत तेच त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांनाच पदावरून बाजूला करण्याचा निर्णय ठरावीक लोक कुठेतरी बसून घेतात आणि तेच अध्यक्ष असल्याचा दावा करून पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा अविर्भाव आणत आहेत. राज्यात सध्या राजकीय पक्ष चोरणारी टोळी मोकाट फिरतेय, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून अजितदादांसह मिंधे आणि भाजपलाही लगावला.

या देशामध्ये राजकीय पक्ष पळविण्याची पद्धत किंबहुना राजकीय पक्ष चोरण्याची पद्धत नव्याने रूढ होत आहे. आमदार गेले म्हणजे पक्ष त्यांच्या मागे जातो हे चित्र देशात तयार झाले तर देशातील कोणताही राजकीय माणूस स्वतःचा पक्ष काढण्याच्या फंदात पडणार नाही. कारण आमदारच जाणार असतील तर काय, असा सवाल करतानाच जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार लवकरच स्वगृही परततील, असा दावा आज केला.

निवडणूक आयोग सुजाण, योग्य निर्णय घेईल
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि घडय़ाळ या निवडणूक चिन्हावर अजित पवार गटाकडून दावा करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबर रोजी सुनाकणी निश्चित केली. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, निवडणूक आयोग सुजाण आहे. तो योग्य निर्णय घेईल, असा आम्हाला विश्वास आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची शक्यता पाहता या प्रकरणात तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.

अजित पवार नेहमी खरे आणि योग्य बोलतात
शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह मिंधे गटाला देण्याबद्दल बोलताना अजित पवार यांनी मनसे एक आमदार म्हणाला पक्ष माझा आहे, तर तसा निर्णय देणार का? असा सवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला केला होता. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. याकडे जयंत पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, अजित पवार नेहमी खरं आणि योग्य बोलतात. त्यांचा हा व्हिडीओ आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत, असा चिमटा त्यांनी काढला.