पोलिसांनी नोंदवला गुन्हा; हायकोर्टाने केला रद्द

बारमध्ये महिलांना नाचण्यासाठी प्रवृत्त केल्याचा एका आरोपीविरोधात पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. कल्पेश मेहता असे या आरोपीचे नाव आहे.

मेहताविरोधात आक्षेपार्ह नाचल्याचाही गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हाही न्यायालयाने रद्द केला. सार्वजनिक ठिकाणी आक्षपार्ह नाचणे हा गुन्हा असल्याचे एका निकालात स्पष्ट करण्यात आले आहे. असा गुन्हा मेहताने केलेला नाही. गुन्हा नोंदवताना नाव नमूद केले व आरोपपत्र दाखल केले म्हणून शिक्षा देता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. त्यामुळे मेहताविरोधातील गुन्हा रद्द केला जात आहे, असे न्या. प्रकाश नाईक व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

पोलिसांचा दावा

बारमध्ये महिला आक्षेपार्ह नृत्य करत होत्या. इतर ग्राहकांप्रमाणे मेहता त्यांना नाचण्यासाठी प्रवृत्त करत होता. चौकशी पूर्ण केल्यानंतरच याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा गुन्हा रद्द करावा, असे कोणतेही ठोस कारण नाही, असा दावा पोलिसांनी केला होता. हा दावा न्यायालयाने मान्य केला नाही.

मेहताची मागणी

मला या गुह्यात गोवण्यात आले आहे. माझे कोणते कृत्य आक्षेपार्ह होते हे गुह्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले नाही. तसे पुरावे पोलिसांकडे नाहीत. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी मेहताने केली होती.

काय आहे प्रकरण

बोरिवली येथील बारमध्ये 14 सप्टेंबर 2019 रोजी पोलिसांनी धाड टाकली तेव्हा तेथे महिला नाचत होत्या. हॉटेलमधील काही जण त्यांना नाचण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्यावर पैसे उधळले जात होते. मेहता या कृत्यात सहभागी होता, असा पोलिसांचा आरोप होता. मेहताविरोधात याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी मेहताने याचिका केली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर केली.