आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

संविधान रक्षणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकरवादी) पक्षाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी त्यासंदर्भातील पत्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे. संविधान बदलणाऱयांच्या विरोधात एकजुटीने उभे राहण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, असे निकाळजे यावेळी म्हणाले.

राहुल शेवाळेंना मतदान करू नका – भारतीय बौद्ध महासभा

बौद्ध धर्मीयांची ऐतिहासिक लेणी आणि स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांना शुल्क आकारण्याची मागणी मिंधे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली होती. त्यामुळे बौद्ध धर्मीयांमध्ये संताप असून येत्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना मतदान करू नका, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेने केले आहे. राहुल शेवाळे हे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनी बौद्ध धर्मीयांच्या ऐतिहासिक स्थळांना शुल्क आकारण्याची मागणी केली होती. तसेच दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या आंबेडकरी जनतेच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले होते, असा आरोप महासभेचे मुंबई अध्यक्ष अॅड. जयेश सातपुते यांनी केला आहे.