वेबसीरिज – दहशतवादाचं सत्यकथन

>>तरंग वैद्य

रहस्य-रोमांच या शैलीत मोडणारी फ्रिलान्सर ही मालिका. शिकल्या-सवरलेल्या परंतु धर्मांध होत सर्व काही सोडून एक वेगळेच आयुष्य जगणाऱया, दहशतवादात सामील होणाऱया कुटुंबाची ही कथा नेहमीपेक्षा वेगळे जग दर्शवणारी आहे. बरोबर काय आणि चूक काय याची जाण जोपर्यंत मनुष्य जातीला होत नाही, तोपर्यंत दहशतवाद संपणे कठीण आहे हे दुर्दैवी सत्यच ही मालिका नकळत दाखवून जाते.

’फ्री लान्सर’ नावाच्या वेब सीरिजचे चार भाग एक सप्टेंबर 2023 ला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले आणि लोकांनी उचलून धरले. प्रत्येक भाग साधारण 50-52 मिनिटांचा. याचा चौथा भाग अशा वळणावर नेऊन सोडला होता की, आता पुढे काय होणार याची उत्कंठा लोकांना लागली. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डिसेंबरच्या दुसऱया आठवडय़ात उर्वरित तीन भाग हॉटस्टारवर आलेत. हे तीन भागही 50-55 मिनिटांचे आहेत.

शिरीष थोरात यांच्या ‘A ticket to syria’ या पुस्तकावरून फ्रीलान्सरचे सात भाग तयार केले आहेत. मुंबईतील एक मुस्लिम परिवारातील सर्व सदस्य आपले सर्वकाही विकून ‘धर्म’ वाचवण्यासाठी घ्एघ्ए मध्ये सामील होतात आणि घ्एघ्ए च्या गढीत, सीरियामध्ये जाऊन राहू लागतात. परिवारातील नवविवाहित तरुणीला आलियाला जेव्हा या गोष्टीची कल्पना येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. परिवाराला तिथे गेल्यावर सर्वांचे मोबाईल जमा करावे लागतात. त्यामुळे कोणाशी संपर्कही साधता येत नाही. या तरुणीच्या सुदैवाने तिचा दुसरा फोन तिच्याकडे राहिलेला असतो, ज्यावरून ती तिच्या आईला सगळा प्रकार सांगू शकते आणि मग तिच्या सुटकेचे प्रयत्न सुरू होतात.

अविनाश कामत हा देशातील गुप्तचर संस्थेत कामाला असतो आणि खूप सक्षम असतो. त्याने अनेक कठीण प्रसंगांवर यशस्वीरीत्या मात केलेली असते, पण काही कारणास्तव त्याला नोकरी सोडावी लागते. कालांतराने तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फ्रीलान्सर’ म्हणून काम करू लागतो. कथेतील तरुणी आलिया त्याच्या मित्राची मुलगी असल्यामुळे तो तिला सोडवण्याचा भार आपल्या खांद्यावर घेतो, हा थोडक्यात कथेचा सार. मूळ कथेसोबत अविनाशच्या खासगी आयुष्यातील प्रसंगही येत असतात, पण ते कथेचा प्रवाह कुठेच थांबवत नाहीत हे पटकथेतील वैशिष्टय़.

‘द वेन्सडे’, ‘स्पेशल छब्बीस’ सारखे चित्रपट आणि अतिशय गाजलेली ‘स्पेशल ऑप्स’ वेब सीरिज देणारे नीरज पांडे या वेब सीरिजचे लेखक, निर्माता असून भव धुलिया यांनी सातही भागांचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘खाकी : द बिहार चॅप्टर’ ही वेब सीरिज दिग्दर्शित केली असून त्यांनी आपले काम छान पद्धतीने हाताळले आहे. मुंबईव्यतिरिक्त मोरोक्को, अमेरिका, युरोप, अरब देशांत या मालिकेचे चित्रीकरण झाले असून बघताना ती भव्यता जाणवते.

मालिकेत सुशांत सिंह, नवनीत मलिक, कश्मीरा परदेशी आणि अनुपम खेरसारखे अभिनयसंपन्न कलाकार आहेत. या शिवाय सर्वच कलाकारांनी आपले 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. अविनाश कामतच्या मुख्य भूमिकेत मोहित रैनाने परत एकदा कमाल केली आहे. प्रसंग कितीही बिकट असो हार मानायची नाही हा लागणारा आत्मविश्वास त्याच्या देहबोलीतून जाणवतो आणि हाच त्याच्या अभिनयाचा विजय आहे. त्याच्या बायकोच्या भूमिकेत मंजिरी फडणीस ही गुणी अभिनेत्री आहे. नैराश्यग्रस्त तरुणीच्या भूमिकेत तिने कमाल केली आहे.

रहस्य-रोमांच या शैलीत मोडणाऱया या मालिकेची कथा थोडी वेगळी आहे. आतापर्यंत अनेक वेळा दहशतवाद्यांवर बेतलेल्या अनेक कथा बघितल्या आहेत. पण शिकले-सवरलेले, मोठय़ा पदव्या घेतलेलेही आपले सर्व काही सोडून एक वेगळेच आयुष्य जगू लागतात, दहशतवादात सामील होतात या पार्श्वभूमीवर ही कथा बेतली असल्यामुळे जरा वेगळी वाटते. बंधनात जगत असूनही त्यांना कसलेच दुःख होत नसते. कारण आपण जे काही करीत आहोत ते आपला धर्म वाचण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या भावनेने ग्रस्त असतात.
बंदुकीतून गोळीबार करणे, बॉम्बस्फोट घडवणे, विमाने उडवणे हे दहशतवाद्यांचे काम जे आपल्याला दिसते, पण हे सर्व घडवण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा, कामाचे नियोजन, आवश्यक शोधकार्य कशा पद्धतीने होते किंवा होत असेल हे या मालिकेत दाखवले आहे. आपल्याला वाटते तसे इथे अशिक्षितांचा बाजार नसून वर लिहिल्याप्रमाणे अनेक सुशिक्षितही इथे हिरीरीने आपले काम बजावत असतात. बरोबर काय आणि चूक काय याची जाण जोपर्यंत मनुष्य जातीला होत नाही, तोपर्यंत दहशतवाद संपणे कठीण आहे हे दुर्दैवी सत्य ही मालिका नकळत दाखवून जाते.

नेहमी आपली सदसद्विवेक बुद्धी वापरावी आणि भूलथापांना बळी पडू नये हे सत्य सांगणारी ‘फ्रीलान्सर’ एकदा जरूर बघा.
[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)