आता रेल्वे प्रवाशांना मोबाईलवर यूटीएस ऍपमध्येच तिकीट दाखवणे बंधनकारक!

 

रेल्वे प्रवासी सध्या यूटीएस अॅपवरून काढलेल्या तिकिटाचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकाच तिकिटाचा स्क्रीन शॉट दाखवून अनेकजण रेल्वे प्रवास करत असल्याचेही समोर आले आहे. पश्चिम रेल्वेने त्याची गंभीर दखल घेतली असून यापुढे मोबाईलवर यूटीएस अॅपमध्येच काढलेले तिकीट टीसीला दाखवणे बंधनकारक केले आहे. एखादा प्रवासी मोबाईलवर तिकिटाचा स्क्रीन शॉट दाखवत असेल तर तो विनातिकीट समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोगस तिकिटावर प्रवास करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

रेल्वे प्रवाशांना तिकिटासाठी तिकीट खिडक्यांवर ताटकळत उभा राहावे लागू नये म्हणून रेल्वेने डिजिटल इंडियनांतर्गत एटीव्हीएम मशीनसोबतच मोबाईलवर यूटीएस अॅपच्या माध्यमातून तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लाखो प्रवासी या अॅपच्या माध्यमातून तिकीट काढून रेल्वे प्रवास करतात. अनेक प्रवासी आपल्या यूटीएस अॅपमधील तिकीट न दाखवता मोबाईवर तिकिटाचा स्क्रीन शॉट दाखवतात. मात्र स्क्रीन शॉट दाखवून एकाच तिकिटावर अनेक प्रवासी प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. तसेच बनावट तिकिटांचा वापर वाढल्याची बाब रेल्वेच्या तपासणीत समोर आली आहे. या बनवाबनवीमुळे रेल्वेच्या महसुलात घट होत आहे. त्याची पश्चिम रेल्वेने गंभीर दखल घेतली असून यूटीएस अॅपवरून बनावट तिकीट काढणाऱया आणि एकाच यूटीएस तिकिटाच्या स्क्रीन शॉटवर प्रवास करणाऱया अनेक प्रवाशांना चाप लावण्यासाठी यापुढे मोबाईलवर स्क्रीन शॉट न दाखवता थेट यूटीएस अॅपमध्येच तिकीट दाखवणे बंधनकारक केले आहे. ज्या प्रवाशाकडे यूटीएस अॅपमध्ये तिकीट नसेल त्याला विनातिकीट समजून कारवाई केली जाईल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

  • मोबाईलद्वारे सध्या मध्य रेल्वेवर दिवसाला सुमारे 90 हजार, तर पश्चिम रेल्वेवर 25 हजार तिकिटांची विक्री.
  • तिकीट खिडक्यांवर 60 ते 65 टक्के, एटीव्हीएमच्या माध्यमातून 20 ते 21 टक्के, तर जेटीबीएस पेंद्रांवरून 8 ते 9 टक्के तिकिटांची विक्री होते.
  • पश्चिम रेल्वेवरील दिवसाची मोबाईल तिकीट विक्री
  • अंधेरी 6,472
  • बोरिवली 4981
  • विरार 4032
  • गोरेगाव 2688
  • कांदिवली 2436