आसाममधून विमानाने येऊन भिवंडीत घरफोड्या

आता बोला… चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणारा चोरटा पाहिलाय का? आसाममधून विमानाने येऊन भिवंडीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्याच्या युनिट 2 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. मोईनुल इस्लाम असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 22 गुन्ह्यांची उकल केली असून 62 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

मोईनुल इस्लाम हा चोरी किंवा घरफोडी करण्यासाठी विमानाने प्रवास करून मुंबईत यायचा आणि चोरी केल्यानंतर पुन्हा विमानाने आसाम व नागालॅण्डला पळायचा. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तो वारंवार वेषांतर करायचा व राहण्याची ठिकाणे बदलत होता. तसेच मोबाईलही वापरत नव्हता. नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला. दरम्यान मोईनुल रमजाननिमित्त आसामच्या सामरोली गावात येणार असल्याची माहिती युनिट 2 च्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलग पाच दिवस वेषांतर करून फिल्मीस्टाईलने अटक केली.

मोईनुल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी 22 गुन्ह्यांची उकल केली आहे. तसेच 62 लाख 24 हजारांचे 889 ग्रॅम दागिने जप्त केले. त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.

दुचाकी लांबवणाऱ्या त्रिकुटाला अटक
अय्याशी करण्यासाठी दुचाकी लांबवणाऱ्या त्रिकुटाला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच बुलेटसह 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. जगदीश माळी, प्रवीण सिरवी, अरविंदकुमार हिरागर अशी या तिघा चोरट्यांनी नावे आहेत. हे तिघेही दिवसा नोकरी करून रात्री दुचाकी चोरी करायचे. नंतर या गाड्यांची विक्री करून आलेल्या पैशांत मौजमजा करत होते. त्यांनी चोरलेल्या गाड्या नवी मुंबई, पुणे आणि राजस्थान येथे विकल्या होत्या.

सशस्त्र दरोडेखोरांना बेड्या
दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नईम सय्यद, सुफियाना अन्सारी, सोहेल शेख अशी तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एअर गन, सुरा, मिरची पावडर असे साहित्य जप्त केले आहे. हे दरोडेखोर रिक्षातून संशयितरीत्या फिरत असताना पोलिसांनी तळवली नाका परिसरात सापळा रचून त्यांना अटक केली.