मुंबईत श्वान, पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण, तीन संस्थांकडून होणार मोजणी

मुंबई महानगरातील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी, प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी पालिकेने आता मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. ह्युमेन सोसायटी इंटरनॅशनल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऑनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने पालिकेने ही मोहीम हाती घेतल्याची माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

मुंबईत याआधी 2014 मध्ये भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. भटक्या श्वानांचे सर्वेक्षण ह्युमेन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेकडून तर पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण युथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऑनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल. मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांच्या सध्याची वास्तविक संख्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली जाईल. तसेच 2014 च्या संख्येसोबत त्याची तुलनात्मक मांडणी करण्यात येईल. त्याआधारे नेमक्या ज्या भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे त्या ठिकाणांसाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम आखून प्राणी कल्याण संस्थांच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. या सर्वेक्षणातून प्राप्त स्थितीनुसार भटक्या श्वानांची सध्याची स्थिती आणि त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगानेही आवश्यक पावले उचलता येतील. तसेच पाळीव प्राण्यांच्या सर्वेक्षणातून लोकांमध्ये नेमके कोणते पाळीव प्राणी पाळण्याचा कल आहे, हे समजेल. तसेच मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि आरोग्य स्थितीही जाणून घेता येईल, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.