सांगलीची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने; राज्यात सर्वांत कमी पाऊस

राज्याच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस सांगली जिह्यात झाला असून, जिह्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. पुढच्या चार दिवसांत जिह्यात मुसळधार पाऊस पडणार, हा वेधशाळेचा अंदाज चारवेळा फोल ठरला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात सांगली जिह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेजारच्या सातारा आणि कोल्हापूर जिह्यात पावसाचा जोर सुरू आहे. कोल्हापूर जिह्यातील अनेक धरणे भरू लागली आहेत. शिवाय सातारा जिह्यात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ होत आहे. मात्र, सांगली जिह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने जिह्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे. शेतकरी मोठय़ा चिंतेत पडला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांत जिह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी गेले तीन दिवस पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत. जिह्यात गेल्या काही दिवसांपासून फक्त ढगांची दाटी कायम असून, पाऊस पडत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.

पावसाने सांगली जिह्याकडे पाठ फिरवल्याने शेतकऱयांबरोबरच सर्वसामान्य माणूस काळजीत पडला आहे. दरवर्षी या वेळेला सांगली जिह्यात पुरेसा पाऊस होऊन नदीच्या पाण्याची पातळीही वाढलेली असते. यंदा मात्र अद्याप कृष्णा नदीची पाणीपातळी नऊ फुटाच्या पलीकडे गेलेली नाही. शिवाय कोयना धरणाची पाणीपातळी 22 टीएमसीच्या आत आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे धरण जुलै महिन्याच्या मध्याला अवघ्या 20 ते 30 टीएमसीपर्यंत पोहोचले आहे.

ऊस वाळून जाण्याचा धोका

सांगली जिह्यातील कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱया जत, कवठे मंहाकाळ, आटपाडी, विटा, मिरज या तालुक्यांत पावसाने दडी मारल्याने या परिसराला पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणक्षेत्रात पाऊस होत असला, तरी अद्यापि कोयना धरणात पाण्याचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे या धरणातून म्हैसाळ, ताकारी, टेंभू या योजनेसाठी पाणी अद्यापि पूर्ण क्षमतेने सोडण्यात येत नाही. त्यामुळे या पाण्याचा लाभही दुष्काळी टापूतील शेतकऱयांना मिळत नाही, त्यामुळे उभी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः ऊसपीक मोठय़ा प्रमाणात वाळून जात आहे.