32 लाखांच्या एमडीसह दोघा ड्रग्ज तस्करांना पकडले , आरोपींमध्ये एका नायजेरियन तरुणाचा समावेश

टुरिस्ट व्हिसाची मुदत संपलेली असतानाही हिंदुस्थानात बेकायदेशीर वास्तव्य करून ड्रग्जची तस्करी करणाऱया एका नायजेरियन ड्रग्ज माफियाला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. शिवाय त्याच्याकडून एमडीचा साठा नशेबाजांना विकण्यासाठी घेणाऱया एका पेडलरला देखील पकडण्यात आले. त्यांच्याकडून 32 लाखांचा एमडीसाठा हस्तगत करण्यात आला.

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटचे पथक मुलुंड परिसरात गस्त घालत असताना त्यांना मिठागर परिसरात एक व्यक्ती एमडीचा साठा घेऊन आली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फिरोज सय्यद (50) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एमडी ड्रग्ज मिळून आला. दरम्यान, चौकशीत त्याला हा एमडी नालासोपारा येथे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या जोसेफ चिक्वू (39) याने दिल्याचे समोर आले. त्यानुसार मग पोलिसांनी नालासोपारा गाठून जोसेफच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडे मिळून 126 ग्रॅम एमडीचा साठा मिळून आला. जोसेफ पकडला गेल्याने नशेबाजांना दणका बसला आहे. 2019 मध्ये जोसेफ टुरिस्ट व्हिसावर हिंदुस्थानात आला होता. त्याच्या व्हिसाची मुदत 2021 मध्ये संपली. मात्र तरी देखील तो येथेच वास्तव्य करीत आहे.