Video – भिवंडीत रिक्षाची दुभाजकला धडक; दोघांचा मृत्यू

पडघा मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात भरधाव रिक्षाने दुभाजकास ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

भिवंडी-पडघा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी निंबवली गावाच्या हद्दीत दुचाकी रस्ता ओलांडत असताना एक भरधाव रिक्षा रस्त्यावरून जात होती. समोर दुचाकी दिसल्याने चालकास वाचवण्याच्या नादात रिक्षाचालकाला आपली रिक्षा नियंत्रित करता आली नाही. त्याने थेट दुभाजकास धडक दिल्याने रिक्षातील किशोर पाटील व सतीश जाधव यांचा मृत्यू झाला.

तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती. दरम्यान, भिवंडी-पडघा मार्गावर यापूर्वी अनेक अपघात घडले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.