ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील दोन्ही पोलीस बडतर्फ

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोन पोलिसांची नावे असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी आज काढले आहेत. ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून 1 ऑक्टोबर 2023 रोजी पळून गेला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती.  त्यावेळी नाथा काळे आणि अमित जाधव हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील केद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डबाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.