सेप्टिक टँकमध्ये कामगारांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक

मालाड पूर्व येथे एका इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मालाड पूर्व येथे रहेजा टॉवर, रत्नागिरी हॉटेलजवळ एका खासगी इमारतीचे कंत्राटदाराकडून काम सुरू आहे. या ठिकाणी सेप्टिकच्या साफसफाईचे काम सुरू असताना दुपारी 4 वाजताच्या सुमारास अचानक तीन कामगार पडल्याने अडकले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. यामध्ये तीनही कामगारांना टाकीमधून बाहेर काढून तत्काळ जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोघांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, 21 मार्च रोजी मालाड पश्चिमेला मालवणी अंबुजवाडी परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये पडून तीन कामगार मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीसही पाठवली. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी पालिका कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.