राज्यकारभार करण्याची त्यांची कुवत नाही, एक फूल दोन हाफ यांनी राजीनामा द्यावा; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

हे तीन तिघाडा सरकार आहे. राज्यकारभार करण्याची त्यांची कुवत नाही. सरकार चालवण्यासाठी ते नालायक ठरले आहेत. हे सरकार उलथवून टाकायला हवे. या घटनेची जबाबदारी स्वीकारत एक फूल दोन हाफ यांनी राजीनामे द्यावे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला. प्रशासनावर त्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे त्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकार राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

अजित पवार यांना आपण समजदार व्यक्ती समजत होतो. मी संघनायक होतो, त्यावेळी माझे काही चुकत होते, तर हे विकेटकिपर नक्की काय करत होते. त्यावेळी हेदेखील संघात होते. ते त्यावेळी का बोलले नाही. त्यावेळी आपण अनेकांशी चर्चा करत होतो. आपण वकीलही बदलले नव्हते. आंदोलनकर्त्यांचे वकीलही तेथे होते. त्या अपयशाचे श्रेय ते मला देत असतील तर आता जी डोकी फोडण्यात आली आहे, त्याचे श्रेय टिमवर्क म्हणून त्यांनी स्विकरायला हवे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. मात्र, आता एक फूल दोन हाफ यांनीही राजीनामा देण्याची गरज आहे. हा जो दोष आहे, तो त्यांच्या टिमचा आहे. हे तीन-तिघाडी, ट्रिपल इंजिन सरकार आहे. कोणीही न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचे नाही, आलेच तर डोकी फोडून टाकू, माता-भगिनी वय वैगरे काही बघणार नाही, अशा निर्घृणपणे त्यांचा कारभार सुरू आहे. न्याय मागाल तर घरात घूसून मारू, हाच संकेत त्यांनी दिला आहे. याचा प्रत्यय आपल्याला बारसूमध्ये आला होता. तेथेही असाच प्रकार घडला होता. तेथेही त्यांनी आमानूष लाठीमार करत अत्याचार केला होता.

स्वतःला हिंदुत्ववादी मानणारे सरकार वारकऱ्यांवर लाठी चालवतात, हे आपल्याला पटत नाही. आताही त्यांनी जो निर्घृण अत्याचार केला आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला. हे सांगणार पोलिसांनी केले, पोलीस सांगणार लाठीने जखमी केले. आता काय लाठीला दोष देणार. पण आदेश कोणी दिला, हे महत्त्वाचे आहे. एक फूल दोन हाफ यांच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागत असतील, तर त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही, हे दिसून येते. सरकार चालवण्याची त्यांची कुवत नाही. सरकार चालण्यासाठी ते नालायक आहेत. त्यामुळे सरकारने राजीनामा देण्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

लाठीमार कोणी आणि कोणाच्या आदेशाने केला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावेळी संघटनायक म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकणार असाल, तर आता ही जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल. बारसूत कोणी लाठीमार केला होता. जालना येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार, गोळीबार करत अश्रूधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. अनेकजण जखमी झाल्याचे, रक्त सांडल्याचे दिसत आहे. महिला, शाळकी मुले यांच्यावरही लाठीमार झाला आहे. ही जबाबदारी सरकारचीच आहे.

फडणवीस यांचे ज्ञान एवढे तोकडे असेल असे वाटले नव्हते…
देवेंद्र फडणवीस यांचे ज्ञान तोकडे असेल, असे वाटले नव्हते. याबाबतचा वटहुकून काढण्याचा अधिकार संसदेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला डावलून राज्य सरकारने वटहुकूम काढावा, असे ते म्हणत असतील, तर राज्यघटनेचा त्यांनी अभ्यासच केला नाही, असे दिसून येते. ते घटना बदलणार, अशी चर्चा आहे, त्याचीच ही सुरूवात आहे, असे म्हणावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वटहुकूम काढण्याचा अधिकार केंद्राचा, संसदेचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य नसेल, तर तो फिरवण्याचा अधिकार संसदेला आहे. माझी चूक झाली असेल असे फडणवीस यांना वाटत असेल तर त्यांनी अधिवेशन घेऊन याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.

संयम बाळगण्याची गरज आहे. मात्र, संयम फक्त आंदोलनकर्त्यांनी बाळगायचा आणि सत्ताधाऱ्यांनी अत्याचार करायचे, असे होत नाही. सर्वात आधी जबाबदारी स्वीकारत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आम्ही लाठ्या कशा मारू, असे मुख्यमंत्री म्हणत असतील, तर त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही. मुख्यमंत्री पदावर बसण्याची तुमची क्षमता नाही. तुम्ही राजीनामा द्या आणि नंतर सांगा पोलीस ऐकत नाहीत म्हणून. आपल्या कार्यकाळातही आंदोलने झाली होती, मात्र कोणत्याही ठिकाणी लाठीमार झाला नाही. जातीय दंगलीही होऊ दिल्या नाहीत. आंदोलकांनी भेटून आम्ही मार्ग काढला होता.

पुरावे, पुरावे करताय, तर मोदींकडे पुरावे मागा
आता ते पुरावे, पुरावे असे करत आहेत. पुरावे तर पंतप्रधान मोदी यांच्याकडेही आहेत. त्यांनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचे पुरावे त्यांच्याकडे असणारच. मात्र, हे त्यांच्यासोबत गेल्यावर यांना पद देण्यात आले. तर पुरावेच हवे असतील तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे पुरावे मागा, असा टोलाही त्यांनी लगावला.

मलमपट्टी करण्यासाठी त्यांनी माफी मागितली
ते माफी मागताय म्हणजे हे प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. बारसूत झालेल्या लाठीमाराबाबत त्यांनी माफी मागितली काय, असा सवालही त्यांनी केला. आता जनता ऐकणार नाही. जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांना राज्यकारभार करणे कठीण झाले आहे. म्हणून मलमपच्ची लावण्यासाठी त्यांनी माफी मागितली आहे. दहशतवाद्यांविरोधात वापरण्याची हत्यारे तुम्ही जनतेविरोधात वापरत आहात आणि आता ते माफी मागत आहेत. त्यांच्या जे आवाक्यात आहे, ते त्यांनी सांगावे, लाठीमार करून आंदोलन दडपणे हा कोणता प्रकार आहे. निर्घृणपणे लाठीमार झाला, त्याला आपला विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवण्याचा अधिकार संसदेला आहे. आता ऐन गणेशात्सवात विशेष अधिवेशन पंतप्रधानांनी बोलावले आहे, तर त्या अधिवेशनात सर्व समाजाबाबतचे प्रश्न त्यांनी सोडवावेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.