राजकारणातल्या गद्दारांना टकमक टोक दाखवायची वेळ आली आहे, उद्धव ठाकरेंचा घणाघात

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरूनच रायगड जिल्ह्याला नाव मिळालं. गद्दारी करणाऱ्यांना याच किल्ल्यावरचं टकमक टोक महाराज दाखवत असत. तसंच आता इथल्या राजकारणात गद्दारी करणाऱ्यांना टकमक टोक दाखवायची वेळ आली आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी सोमजाई नगर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील तसेच मविआचे इतर नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या सुडाच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाषणात आसुड ओढले. ते म्हणाले की, इथे व्यासपीठावर पाहिलं मी शिवसेना म्हणून, शरद पवार हे राष्ट्रवादीकडून, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडून, जयंत पाटील शेकापकडून आहेत. या पक्षासोबत आमच्या मारामाऱ्या झालेल्या आहेत. आणि एवढी वर्षं गेल्यानंतर सुद्धा आम्ही एका व्यासपीठावर येऊ शकलो याचं कारण असं की त्या सगळ्या मारामाऱ्या होत्या, तो विरोध होता तो व्यक्तिगत कधीच नव्हता. सूडाचं राजकारण कधीच कोणी केलं नाही. म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री जगजाहीर आहे. तशी अंतुले आणि बाळासाहेबांची मैत्रीही उघड होती. पण जिथे मत पटायची नाहीत, त्या मताला विरोध केला जायचा. पण आता असं आचरण सुरू आहे की विरोधक असेल तर संपव पण सोबती असेल त्याला सुद्धा संपव. हे समीकरण ‘मी’करणाच्या विरोधात सुरू आहे. सगळं काही मीच, माझ्याशिवाय कुणीच नाही, कुणीच नको!, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘कालसुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले, शिर्डीला गेले. मला खरंतर अपेक्षा होती की आता जो प्रश्न धुमसतोय, आरक्षणाचा, त्याबद्दल पंतप्रधान काहीतरी बोलतील. पण त्याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. हेच वैशिष्ट्य आहे त्यांचं. मणिपूर पेटतंय, बोलायचं नाही. आरक्षणाचा मुद्दा, लोक रस्त्यावर उतरलेत, आत्महत्या करताहेत, असं करून कशाला तरी बोलून जायचं. काल त्यांनी 70 हजार कोटींचा उल्लेख केला नाही. राष्ट्रवादीवरती 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, तो काल का नाही केला? बाजूला कोण बसले होते? हे सगळं जे थोतांड सुरू आहे. मग त्यांनी कुठून काहीतरी काढलं की शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांनी काही केलं नाही. पण, त्याचा उल्लेख आता जयंत पाटील यांनी केला. त्यावेळी शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, शरद पवार कृषिमंत्री होते. मला आठवतंय, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यावेळी देशात 70 हजार कोटींची कर्जमाफी प्रथमच करण्यात आली होती. जणु कोणी आजपर्यंत झालेलंच नाही, जे काही होतंय ते मी आल्यानंतरच होतंय. नळाला पाणीसुद्धा आताच येतंय. गंगासुद्धा आताच या भूमीवरती अवतरली आहे, असा आभास निर्माण केला जातोय. पण लोकं काही मूर्ख नाहीयेत. सुडाचं राजकारण किती कराल. एकदा शेतकऱ्याचा आसुड कडाडला की भलेभले झोपून जातात. कुणाचं काय चालत नाही. कारण सर्वसामान्य माणसाची जी ताकद असते ना, सत्ताधारी कितीही माजलेला असला तरी त्याला सर्वसामान्यांपुढे झुकावं लागतं हा देशाचा इतिहास आहे.’ असं ते यावेळी म्हणाले.

‘या जिल्ह्याला रायगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यामुळे मिळालेलं आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य टकमक टोक आहे. जे गुन्हेगार आहेत, गद्दारी करणारे आहेत. त्यांना महाराज टकमक टोक दाखवायचे. तसं, राजकारणात इथल्या गद्दारांना टकमक टोक दाखवायची वेळ आलेली आहे. तुम्ही लोकांच्या मतावरती, एका चिन्हावरती निवडून येता आणि तुमच्यावर बला आली की ती झाकायला पलिकडे जाता. असं कधी मिंधं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं. त्यावेळी त्यांना सुद्धा मिर्झाराजा जयसिंगसमोर हात बांधून जावं लागलं होतं. तेव्हाचा पराभव भयानक होता. आता जास्तीत जास्त काय होईल, निवडणुकीत डिपॉझिट जाईल. पण, पुन्हा निवडणूक होईल. त्यावेळी शिरच्छेद हीच शिक्षा होती. तरीही शिवाजी महाराज औरंगजेबापुढे झुकले नव्हते. ज्या मातीत शिवाजी महाराज जन्मले तीच ही माती आहे. याच मातीत गद्दार जन्माला येऊन जर तो दिल्लीपुढे झुकत असेल तर त्याला सपाट करून टाकायला पाहिजे.’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.