भटकंतीला गेले, खोक्यात बंद झाले त्यांना परत घरात घेणार नाही! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

खोके देणाऱयांनी आणि घेणाऱयांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चोरला तरी त्यांना उठता-बसता अगदी स्वप्नातही उद्धव ठाकरे दिसतात; कारण उद्धव ठाकरे एकटा नाही, तर अख्खा महाराष्ट्र आमच्यासोबत आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंध्यांना लगावला. भटकंतीला गेले, खोक्यात बंद झाले त्यांना परत घरात घेणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

घाटकोपर, उल्हासनगर, बीड, अकोला येथील भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱयांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱया सर्वांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यामध्ये पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांचाही समावेश आहे. देशातील लोकशाही आणि महाराष्ट्रावर होणाऱया अन्यायाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी करणाऱया मिंध्यांचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला. ‘काहीजण भटपंतीला बाहेर गेले आहेत, त्यांना आता घरात घेणार नाही. कारण जे खोक्यामध्ये बंद झाले, त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही. शिवसेनेप्रमाणे प्रेम दुसऱया पक्षात मिळत नाही हेच आपल्या शिवसेनेचे वैशिष्टय़ आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणांनी ‘मातोश्री’चा परिसर दुमदुमला.

13 जानेवारीला कल्याणमधील शाखांना भेटी देणार
13 जानेवारी रोजी आपण कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघांना भेटी देण्याबरोबरच शिवसेना शाखांना भेटी देऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पैशांनी इतर गोष्टी विकत घेता येतात, पण आपुलकी, माया, प्रेम, हिंमत विकत घेता येत नाही आणि विकली जाऊ शकत नाही. शिवसैनिकांची हीच माया, प्रेम आणि जिद्द आपल्याकडे आहे.
लढाई मोठी आहे, पण कट्टर शिवसैनिक एकवटले तर लढाई सोपी आहे असे सांगतानाच, माणूस जिद्दीने उभा राहिला तर कितीही पहाडासारखी संकटे आली तरी तो डगमगत नाही आणि असे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत.