‘गॅरंटी देतो! 7 दिवसात CAA लागू होणार’, केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी दावा केला आहे की नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (CAA) येत्या सात दिवसात संपूर्ण हिंदुस्थानात लागू केला जाईल.

‘मी गॅरंटी देऊ शकतो की, येत्या सात दिवसांत फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात CAA लागू होईल’, असं ठाकूर म्हणाले. बंगालच्या दक्षिणेकडील 24 परगणा येथील काकद्वीप येथे एका सार्वजनिक मेळाव्यात भाषण करताना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.

बंगालमधील बनगाव येथील भाजपचे लोकसभा खासदार शंतनू ठाकूर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या CAA विधानाचा पुनरुच्चार केला.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार CAA लागू करेल आणि तसे करण्यास कोणीही रोखू शकत नाही असं ठामपणे सांगितलं. CAAला कट्टर विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला होता.

कोलकात्यातील एका मोठ्या सभेत केलेल्या भाषणादरम्यान, अमित शाह यांनी घुसखोरी, भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार आणि तुष्टीकरण या मुद्द्यांवर ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि लोकांना बंगालमधून त्यांचे सरकार पाडून 2026 मध्ये भाजपला निवडून देण्याचे आवाहन केलं होतं.

दरम्यान, केंद्राने अद्याप CAAसाठी नियम तयार करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे बाकी असल्याने ते अर्धवट स्थितीत आहे.