वर्सोवा ते घाटकोपर मार्ग मेट्रोचे काही खरे नाही, ‘मुंबई मेट्रो वन’ने थकवला 461 कोटींचा मालमत्ता कर

वर्सेवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱया मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मुंबई महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षापर्यंतचा 461 कोटी 17 लाख 615 रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून मुंबई मेट्रो वनच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी अद्यापही करभरणा केलेला नाही.

मुंबईतील विविध मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा करून कठोर दंडात्मक कारवाई टाळावी आणि करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने वारंवार केले जात आहे. करभरणा न करणाऱया बडय़ा मालमत्ताधारकांना नोटीसही बजावण्यात येत आहे.

मुदतीपूर्वी करभरणा करा, पालिकेचे थकबाकीदारांना आवाहन

2023-24 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम तारीख 25 मे आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

21 दिवसांच्या आत कर भरा, नाही तर कारवाई!

के (पश्चिम) आणि एल विभागातील मालमत्तांसंदर्भात पंपनीला पालिकेने नोटीस बजावली असून 21 दिवसांच्या आत मालमत्ता कर भरणा करण्यास सांगितले आहे. तर के (पूर्व) आणि एन विभागाकडून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय पंपनीच्या चार विभागातील 28 मालमत्तांसाठी 2023-24 या वर्षासाठी 18 कोटी 29 लाख 36 हजार 11 रुपये इतका कर आकारण्यात आला आहे.

अंधेरी, कुर्ला, घाटकोपरमधील 28 मालमत्तांचा कर थकवला

– वर्सोवा ते घाटकोपरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवा देणाऱया मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण 28 मालमत्तांचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे.
– के (पश्चिम) विभागातील एकूण 18 मालमत्तांसाठी 311 कोटी 77 लाख 85 हजार 668 रुपये तर के (पूर्व) विभागातील 6 मालमत्तांसाठी 116 कोटी 29 लाख 1 हजार 51 रुपये थकबाकी आहे.
– एल विभागात 2 मालमत्तांसाठी 19 कोटी 4 लाख 629 आणि एन विभागातील 2 मालमत्तांसाठी 14 कोटी 6 लाख 13 हजार 267 रुपये इतका कर थकीत आहे.