वसई-पनवेल मेमू ट्रेन फास्ट ट्रॅकवर! 30 मिनिटाला एक गाडी धावणार, प्रवासी वाहतूक क्षमता दुप्पट होणार

वसई-दिवा-पनवेल मार्गावर मध्य रेल्वेकडून चालवली जाणारी मेमू ट्रेन सेवा फास्ट ट्रकवर येणार आहे. या मार्गावर रेल्वेकडून अनेक मालगाडय़ा चालवल्या जात असल्याने सध्या येथे तब्बल 40 मिनिटांनी एक मेमू गाडी रेल्वे चालवते. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ स्थानकात ताटकळत थांबावे लागते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मालवाहतुकीसाठी या मार्गाला समांतर डेडिकेटेड कॉरिडॉर (डीडीएफसी) अंतर्गत स्वतंत्र रेल्वे ट्रक टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वसई-पनवेल मार्गावरील मालगाडय़ांची संख्या कमी होणार असल्याने येथे सध्या 26 एवढी असलेली मेमू गाडय़ांची संख्या 52 पर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. त्याचा या मार्गावर प्रवास करणाऱया हजारो प्रवाशांना लाभ होणार असून लोकल गाडय़ांवरील भार काहीसा कमी होऊ शकणार आहे.

मध्य रेल्वेच्या वसई-दिवा-पनवेल या 66 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेमू ट्रेनसह मालगाडय़ा चालवल्या जातात. मात्र या मार्गावर मोठय़ा प्रमाणात मालगाडय़ा चालवल्या जात असल्याने वसई, भिवंडी, खारबाव, कोपर, कामण, दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली येथील प्रवाशांसाठी दिवसभरात केवळ 26 मेमू फेऱ्या चालवल्या जातात. सदरची गाडी 40 मिनिटांनी चालवली जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे कल्याण, डोंबिवली येथील प्रवाशांना वसईला जायचे असेल तर ते मेमूऐवजी मध्य रेल्वेच्या लोकलने दादर आणि पुढे पश्चिम रेल्वेची लोकल पकडून वसईच्या दिशेने जातात. या प्रवासाला जवळपास अडीच तास लागतात, मात्र सध्या डेडिकेटेड कॉरिडॉरचे काम वेगात सुरू असून ते पुढील वर्षभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे वसई-पनवेल मार्गावरील मालगाडय़ांची संख्या कमी होणार असल्याने येथे मेमू सेवांची संख्या 52 पर्यंत वाढवण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

लोकलवरील भार कमी होणार

सध्या वसई-विरारला जाण्यासाठी कल्याण, डोंबिवली, दिवा परिसरातील प्रवाशांना मेमूचा पर्याय चांगला आहे. मात्र या दोन सेवांमधील वेळेचे अंतर जास्त आहे. त्यामुळे प्रवाशी मेमूऐवजी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनने प्रवास करणे पसंत करतात. मात्र भविष्यात रेल्वेकडून मेमूच्या फेऱ्या वाढवून दोन गाडय़ांमधील वेळही कमी केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांना लोकलऐवजी मेमूने प्रवास करणे सोयीची ठरू शकणार आहे. परिणामी लोकलवरील भार कमी होऊ शकणार आहे.