मीच माझ्या परतीचे दोर कापले! वसंत मोरेंना अश्रू अनावर

आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिलो पण काहींनी चुकीचे अहवाल दिले. या आधीही मी तक्रार केली होती. मात्र, तिची दखल घेतली नाही. मी एकनिष्ठतेचा कळस केला होता आणि आता स्वतःच माझ्या परतीचे दोर कापले आहेत, असं मनोगत मनसेतून राजीनामा देणाऱ्या वसंत मोरे यांनी व्यक्त केलं. हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

मनसेतून राजीनामा दिल्यानंतर मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पक्षात चांगलं वातावरण असूनही मला निवडणूक लढवू दिली नाही. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे माझ्याविषयी चुकीचे अहवाल दिले गेले. 2012 ते 2017 या काळात पुणे मनपामध्ये ताकद असूनही लोकसभा निवडणुकीबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण केलं गेलं. निवडणूक लढवणं हा गुन्हा आहे का, असंही मोरे यांनी यावेळी विचारलं.

मी काल रात्रभर झोपलेलो नाही. काल रात्री पोस्ट केली पण त्यावर कुणीही विचारलं नाही. आता राजीनामा दिल्यानंतर यांचे फोन आले. माझ्याबद्दल चुकीचे अहवाल देण्यात आले. आता मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. जे लोक इच्छुक आहेत, त्यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, असंही वसंत मोरे यावेळी म्हणाले.