केंद्रीय मंत्री गडकरींच्या सभेला खुर्च्या रिकाम्या! उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांची दांडी

मिंधे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांच्या प्रचारार्थ आज रविवारी रामलीला मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेसाठी भव्यदिव्य सभामंडप उभारून दहा हजार खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र, सामान्य नागरिक व भाजपसह महायुतीतील इतर घटक पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सभेकडे पाठ फिरविल्याने हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यातच खुद्द उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांनीही सभेला दांडी मारल्याने चर्चेला उधाण आले आहे.

हिंगोली लोकसभेची जागा मिंधे गटाचे लावणीफेम विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा विरोधात रान पेटवले होते. शेवटी मिंध्यांना हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून ऐनवेळेला बाबुराव कदम कोहाळीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकावी लागली. परंतु, ही जागाच भाजपला सोडवून घेण्यासाठी भाजपची मंडळी आग्रही होती. तसे न झाल्यामुळे पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत भाजपचे मोजके पदाधिकारी सोडल्यास अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिंधे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारापासून दूर राहणे पसंद केले आहे.

दरम्यान, आज रविवारी रामलीला मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची उपस्थिती होती. मात्र सभेस अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे, माजी खासदार शिवाजी माने, रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती होती. पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भाजप सरकारच्या 10 वर्षांच्या काळातील शासकीय योजनांच्या जुमलेबाज माहितीचा पाढा वाचला.

सभेसाठी भव्यदिव्य सभामंडप उभारून जवळपास दहा हजार खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ दीड ते दोन हजार नागरिकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर हजारो खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. सभेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सभामंडपातील हजारो रिकाम्या खुर्च्यांचीच जोरदार चर्चा सुरू होती.

उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांची दांडी

मिंधे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ शहरातील रामलीला मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले. मात्र, सभेला उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर यांनीच दांडी मारली. त्यामुळे सभेला आलेल्या नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये बाबुरावांच्या अनुपस्थितीवरून जोरदार चर्चा रंगली होती. मागील काही दिवसांपासून मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या दोन, तीन सभेलाही बाबुराव कदम कोहळीकर अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे बाबुराव कदम यांनी आतापासूनच हार मानल्याची चर्चा रंगू लागली आहे.