बोगस औषधविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, विनायक राऊत यांची मागणी

देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांवर आलेले थ्रीप्सचे संकट हे आंबा बागायतदार यांची आर्थिक हानी करणारे असून स्थानिक बाजारात थ्रीप्स सारख्या रोगावर औषधे उपलब्ध नसतानाही बोगस औषधांची विक्री करून आंबा बागायतदार यांची फसवणूक केली जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असून विक्री करण्यात येणाऱ्या कीटकनाशक औषधे यांची तपासणी कृषी विभागाने करावी. तसेच बोगस औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.अशी सक्त सूचना खासदार विनायक राऊत यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या आंबा बागायतदार, शेतकरी, कृषिअधिकारी यांच्या बैठकीत दिली.

तालुक्यातील आंबा बागायत दारांवर थ्रीप्सचे संकट आले असून यावर आवश्यक ती उपाय योजना तसेच समस्या जाणून घेण्यासाठी देवगड तालुका युवसेनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते. या बैठकीला खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, कृषी अधिकारी कैलास ढेपे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, कृषी अधिकारी ओहाळ, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, तालुका प्रमुख मिलिंद साटम, सचिन सावंत, राजू राठोड, युवा प्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, उपतालुका प्रमुख बुवा तारी,रवींद्र जोगल, नगरसेवक तेजस मामघाडी, संतोष तारी, नितीन बांदेकर, माजी नगरसेवक विकास कोयंडे, महिला संघटक सायली घाडीगावकर व अन्य उपस्थित होते.

या बैठकीत कृषी विभागाने गावागावात बागतदारांना कीटकनाशक वापर बाबत माहिती द्यावी. एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम राबविणे गरजेचे असून 1 रु भरून फसल पीक विमा योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करून जे लाभार्थी आद्यपही विमा योजने पासून वंचित आहेत त्यांच्या नुकसानभरपाईचा पंचनामा करून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या बागायत दाराना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना केली. आंबा संशोधन केंद्रातून या किटनाशके तसेच थ्रीप्स सारखा फूलकिड, फळ माशी सारख्या रोगाचे संशोधन व्हावे, या साठी देवगड तालुक्यात अद्ययावत संशोधन प्रयोगशाळा उभारण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यास आपले निश्चित सहकार्य राहील असेही खास विनायक राऊत यांनी सांगितले.