कोहलीने सचिनचे तीन ‘विराट’ विक्रम मोडले; शतकांचे अर्धशतक साजरे

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मैदानात उतरतो ते विक्रम मोडण्यासाठीच. आज पुन्हा याची प्रचिती आली आहे. क्रिकेटचा देव अशी ख्याती असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिम तेंडूलकर याचे तीन विक्रम कोहलीने आज मोडत स्वतःचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा दबदबा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही दिसत आहे. विराटच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक मोठमोठे विक्रम केले होते. विराट हा बऱ्याचदा सचिनचे विक्रम मोडीत काढताना दिसतो. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि न्यूझीलंड एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.यात विराट कोहलीने सचिनेचे तीन विक्रम मोडले आहेत.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेल्या रोहित शर्माने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. मात्र, तो 29 चेंडूत 47 धावा फटकावून बाद झाला. रोहित बाद होताच विराट कोहली मैदानात उतरला. विराटने मैदानात उतरताच सचिन तेंडुलकरचा खास विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहली हा विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. विराटआधी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक उपांत्य सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकर त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत तीन विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्य फेरीचे सामने खेळला आहे. तर विराटने सचिनचा हा विक्रम मोडून विश्वचषक स्पर्धेतील चार उपांत्य सामने खेळण्याचा विक्रम रचला आहे. सचिन तेंडुलकरने 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. तर विराट कोहली 2011, 2015,आणि 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला आहे. आज विराटने या स्पर्धेतील चौथ्या उपांत्य सामना खेळत सचिनचा विक्रम मोडला.

सचिन तेंडुलकरचे आणखी दोन विक्रम विराटने मोडले आहेत. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा फटकावल्या होत्या. एका स्पर्धेतली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सचिनचा हा विक्रम 16 वर्षापासून कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाही. विराटने सचिनचा हा विक्रमही मोडला आहे. विराटने यंदाच्या स्पर्धेत 99 च्या सरासरीने 594 धावा फटकावल्या आहेत. आजच्या सामन्यात 80 धावा फटकावल्यानंतर त्याने सचिनचा 673 धावांचा विक्रम मोडला. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन आणि विराट या दोघांची 49 शतके झाली आहेत. विराटने या सामन्यात शतक झळकावत शतकांचे अर्धशतक साजरे करत सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे.