आयपीएलच्या कामगिरीवर भवितव्य; टी-20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत विराट कोहलीचे संभ्रम कायम

rcb-virat-kohli

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून पूर्णपणे दूर राहिलेला विराट कोहली आता टी-20 वर्ल्ड कपपासूनही दूर होत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. मात्र विराटबाबतचा अंतिम निर्णय आयपीएलच्या कामगिरीनंतरच घेतला जाणार आहे. जर आयपीएलमध्ये विराटची बॅट तळपली आणि त्याने धावांचा पाऊस पाडला तर तो पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल, असा विश्वास बीसीसीआयच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

येत्या 2 ते 29 जूनदरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेसाठी येत्या काही दिवसांत आयसीसीला खेळाडूंची यादी पाठवावी लागणार आहे. जर त्या यादीत विराटच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही तर त्याचे वर्ल्ड कपमध्ये खेळणे शक्य नसेल आणि जर त्याचे नाव असेल तर तो वर्ल्ड कप खेळणार असल्याचे अंदाज बांधले जाऊ शकतात. वन डे वर्ल्ड कपनंतर बीसीसीआय रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वन डे आणि टी-20 खेळावे असा आग्रह धरला होता. त्यासंदर्भात दोघांशी चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळले. रोहित त्यानंतर वन डे सामन्यांतही खेळला. तसेच आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये तोच संघाचे नेतृत्व सांभाळणार असल्याचे बीसीसीआय सचिवांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे विराट टी-20 आहे की नाही, याबाबत तोच अधिक स्पष्ट माहिती देऊ शकतो. गेल्या काही दिवसांत हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नव्या पिढीची हवा असल्यामुळे विराटला टी-20 क्रिकेटपासून दूर ठेवण्याचाही काही हितचिंतक प्रयत्न करत आहेत. पण विराटचे भवितव्य पूर्णतः आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये विराट धावांचा पाऊस पाडणार आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळणार, असा विश्वास क्रिकेटप्रेमींना आहे.