Virat kohli : कमी स्ट्रईक रेटमुळे विराट कोहलीवर होतीये टीका; वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूने केली पाठराखण

आयपीएल 2024चा सतरावा हंगाम आता एन भरात आला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आयपीएलमध्ये चांगल्या लयीत दिसत आहे. पण स्ट्राईक रेट कमी असल्यामुळे विराटवर टीका सुद्धा केली जात आहे. अशातच वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांनी आगामी टी20 विश्व चषकाच्या अनुषंगाने विराटची पाठराखण करत एक मोठे वक्तव्य केले आहे.

रॉयल चैलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहलीने 67 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. मात्र विराट कोहलीची शतकी खेळी सर्वात संथ खेळी असल्याचे बोलले जात आहे. 2009 मध्ये मनीष पांडेने सुद्धा शतक पूर्ण करण्यासाठी बराच वेळ घेतला होता. ब्रायन लारा यांनी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलत असतना विराट कोहलीची पाठराखण केली आहे.

“स्ट्राईक रेट खेळाडूच्या क्रमवारीवर अवलंबून असतो, ओपनिंगला येणाऱ्या खेळाडूंचा स्ट्राईक रेट हा 130-140 असणे काही वाईट नाही. मात्र मधल्या फळीमध्ये फलंदाजी करताना फलंदाजाने 150 ते 160च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणे गरजेचे असते. जसे की आयपीएमध्ये पाहिले असेल की, फलंदाज डावातील शेवटच्या षटकांमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने धावा करतो,” असे ब्रायन लारा यांनी म्हंटले आहे.

“विराट कोहली सारखा फलंदाज 130 च्या स्ट्राईक रेटने खेळाची सुरुवात करतो आणि त्यानंतर त्याच्याकडे 160 च्या स्टाईक रेटने खेळाची समाप्ती करण्याची संधी असते,” असे म्हणत ब्रायन लारा यांनी विराट कोहलीची पाठराखण केली आहे.