‘पाटगाव’चे पाणी अदानींच्या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी! अनफ खुर्दच्या पाळ्याचा हुडा येथील शेतकऱ्यांचा इशारा

कोल्हापुरातील पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्गातील अदानींच्या प्रकल्पाला दिल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्दच्या पाळ्याचा हुडा येथील शेतकऱयांनी दिला आहे. याबाबत शेतकऱयांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे. तसेच पालकमंत्री या नात्याने शेतकऱयांच्या हक्काचे एक थेंबही पाणी सिंधुदुर्गात न जाऊ देण्याची विनंती शेतकऱयांनी केली आहे. अशोक मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून निवेदन दिले. पाटगाव प्रकल्पातील पाण्यावर सिंधुदुर्ग जिह्यातील अंजीवडे येथे अदानी कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काम सुरू आहे. पाण्यावरील वीजनिर्मितीच्या या मेगा प्रकल्पासाठी कोल्हापुरातील पाटगाव प्रकल्पातून पाईपद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. अगोदरच शेतीला पाणी कमी पडत असल्याने अदानींच्या प्रकल्पाला ग्रामस्थांकडून विरोध होत असून, भुदरगड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पाटगाव धरणाच्या पाण्यावर अदानी यांचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील अंजिवडे गावी होणाऱया या प्रकल्पासाठी पाईपमधून पाणी नेले जाणार आहे. पाटगावचे पाणी भुदरगडसह कागल तालुक्यातील आणि सीमा भागातील जनतेच्या हक्काचे आहे. माजी आमदार हरिभाऊ कडव यांच्या दूरदृष्टीतून आणि अथक प्रयत्नातून बांधलेल्या कडगाव प्रकल्पामुळेच वेदगंगा नदी बारमाही वाहते. त्यावर हजारो एकर जमीन अवलंबून आहे. हे पाणी अदानींच्या प्रकल्पाला दिल्यास हजारो एकर जमीन ओसाड पडून शेतकऱयांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे शेतकऱयांच्या हक्काचे एक थेंबही पाणी सिंधुदुर्गात जाऊ न देण्यासाठी जिह्याचे पालकमंत्री या नात्याने आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची कमालीची गुप्तता!

शेतकरी अशोक सुतार म्हणाले, या प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती आपण माहिती अधिकाराखाली गोळा केली आहे. या प्रकल्पासह वन विभागाच्या सर्व्हेला परवानगी देताना आणि इतर सर्व कागदपत्रांबाबत अधिकाऱयांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.