पत्नीला पेट्रोल टाकून जाळले; बायकोची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये, या मागणीसाठी लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून तिचा खून केल्याप्रकरणात लातूरच्या सत्र न्यायालयने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मृत विवाहित महिला जयाबाई गजानन चक्रे (रा बौद्ध नगर, लातूर) हिला तिचा पती गजानन एकनाथ चक्रे व दीर संतोष एकनाथ चक्रे माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून नेहमी मारहाण करून त्रास देत होते. दीर संतोष चक्रे याच्या मेव्हण्याला मुलगा झाला आहे, त्याला कपडे व सोने खरेदी करण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे आणत नाहीस, म्हणून मारहाण केली. 13 जानेवारी 2021 रोजी गजानन चक्रे व संतोष चक्रे यांनी जयाबाईच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यात जयाबाई 40 टक्के भाजली होती. तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा 12 फेब्रुवारी 2021 रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी जयाबाईचा भाऊ रवी सोपानराव मुळे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध विवेकानंद पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या तत्कालीन पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून प्रत्यक्षदर्शी व माहितगार साक्षीदार यांचे जबाब नोंदवून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.1 आर.बी.रोटे यांचे समोर झाली. या प्रकरणात एकूण 09 साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या. ही घटना जयाबाईचा लहान मुलासमोर झाल्याने त्याने तशी साक्ष न्यायालयात दिली. मुलाची जबानी ग्राह्य धरून समर्थनीय पुरावा आल्याने आरोपी गजानन एकनाथ चक्रे (वय 40) याला दोषी ठरवत जन्मठेप व 1000 रुपये दंड, तर कलम 498(अ) खाली 2 वर्ष शिक्षा व 500 रू दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक, दयानंद ह.पाटील यांनी केला, तपासात मदतनीस म्हणून पोलीस नाईक, वाजिद चिखले व पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार कोतवाड यांनी काम केले. सदर प्रकरणी न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री यू. पवार यांनी काम पाहिले.