पतीचा खून; पत्नीसह प्रियकराला अटक

प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पतीचा गळा आवळून खून करून हात-पाय दोरीने बांधून नीरा कॅनॉलमध्ये टाकल्याचे उघडकीस आले. आज फलटण पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यातील एकजण फरार आहे.

अजित पोपट बुरुंगले (वय 24, रा. शिवाजीनगर, फलटण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) याला अटक केली असून, राहुल उत्तम इंगोले (वय 22, रा. वाघोली, पुणे) हा फरार आहे.

अजित बुरुंगले हा रविवारी रात्री घरातून निघून गेल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी फलटण पोलिसांत दिली होती. पोलीस तपास करीत असताना मंगळवारी (दि. 19) विडणी (त़ा  फलटण) गावच्या हद्दीत नीरा उजव्या कालव्यामध्ये एक मृतदेह सापडला होता. तपासाअंती हा मृतदेह अजित बुरुंगले याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अजित याच्या पत्नीकडे चौकशी केली असता, तिने उडावाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता, तिचे लग्नाआधी करण भोसलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. तिला करणसोबत लग्न करायचे असल्याने यामध्ये अजितचा अडथळा येत होता.

रविवारी रात्री करणने अजितला फोन करून घराबाहेर बोलावून घेतले. तेथे बेसावध असणाऱ्या अजितचा करण आणि राहुल यांनी गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून नीरा उजव्या कालव्यात टाकून दिल्याचे मान्य केले. पोलिसांनी करण भोसलेला अटक केली असून, राहुल इंगोले हा फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील शेळके तपास करीत आहेत.