ऑस्ट्रेलियाचे स्वप्न उद्ध्वस्त; इंग्लंड पहिल्यांदाच अंतिम फेरीत

उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले तेव्हाच ठरले होते की, महिला फिफा वर्ल्ड कपला नवी जगज्जेती टीम लाभणार. इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा 3-1 ने पराभव करीत आपले अंतिम फेरीत धडक मारण्याचे स्वप्न साकार केले. आता स्पेनपाठोपाठ इंग्लंडही जगज्जेतेपदाच्या लढतीत पोहोचल्यामुळे तिसऱयांदा ‘ऑल युरोपियन फायनल’ रंगेल.

यजमान ऑस्ट्रेलियाच्या बाजूने अवघे स्टेडियम दणाणले होते. त्यांनी 63 व्या मिमिटाला गोल करून इंग्लंडची 1-1 अशी बरोबरी साधल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित पाऊण लाख चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते, पण तो एक गोल ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरा ठरला. त्यानंतर 71 आणि 86 व्या मिनिटाला इंग्लडच्या खेळाडूंनी आणखी दोन केले आणि आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

आज उपांत्य सामन्यात इंग्लंडपेक्षा ऑस्ट्रेलियावरच दबाव अधिक होता. तब्बल पाऊण लाख चाहते ऑस्ट्रेलियासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. युरोपियन चॅम्पियन इंग्लंडला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार होते, पण तसे काहीच घडले नाही. इंग्लंडच्या महिलांना पहिल्या हाफवर आपले वर्चस्व दाखवताना इला टूने 31 व्या मिनिटाला आपले संघाचे गोलखाते उघडले. या 45 मिनिटांच्या खेळात इंग्लंडच सर्वत्र दिसली. त्यानंतर 63 व्या मिनिटाला सॅम केरने गोल केला आणि ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. ती या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत होती. तिच्या या गोलने स्टेडियमला नवसंजीवनी दिली, पण तिचा हा गोल फार काळ उत्साह राखू शकला नाही. इंग्लिश लॉरेन हॅम्पने 71 व्या मिनिटाला गोल करून संघाला पुन्हा एकदा आघाडीवर नेले आणि सामना संपायला अवघी चार मिनिटे शिल्लक असताना अॅलेसिया रुसोने एक अफलातून गोल करत इंग्लंडचा विजय जवळजवळ निश्चित केला. या गोलनंतर अवघ्या स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली. ती शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. आता स्पेन आणि इंग्लंड हे दोन्ही युरोपियन संघ येत्या रविवारी आपल्या पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदासाठी भिडतील. दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया आइण स्वीडन तिसऱया क्रमांकासाठी शनिवारी खेळतील.

तिसऱ्यांदा युरोपियन फायनल
– स्पेन आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत कधीही वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले नव्हते. दोघांनीही पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.
– महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तिसऱयांदा दोन्ही संघ युरोपचे असतील.
– 1991 साली खेळल्या गेलेल्या दुसऱया वर्ल्ड कपची फायनल जर्मनी आणि नॉर्वे या युरोपियन संघात खेळली गेली होती. त्यानंतर 2003 साली स्वीडन आणि जर्मनी हे युरोपियन भिडले. त्यानंतर आता इंग्लंड आणि स्पेन हे युरोपियन जगज्जेतेपदासाठी आमने सामने येणार आहेत.
– एकूण आठ वर्ल्ड कपच्या स्पर्धा झाल्या असून अमेरिका (4),जर्मनी (2), जपान आणि नॉर्वे हे चार देश जगज्जेते ठरले आहेत.
– फायनलमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी तिसरी युरोपियन टीम जगज्जेती असेल.
– आजवर युरोपमध्ये तीन स्पर्धा झाल्या आहेत आणि केवळ एकदाच युरोपियन जगज्जेती ठरली आहे. उर्वरित दोन्ही स्पर्धा जर्मन संघाने अमेरिका आणि आशियात जिंकल्या आहेत.
– आजवर यजमान संघ केवळ एकदाच अंतिम फेरी खेळला आहे. 1999 साली यजमान अमेरिकेने अंतिम फेरीत धडक मारली आणि जगज्जेतेपद ही पटकावले. हा अपवाद वगळता एकही यजमान ना अंतिम फेरी पोहोचला ना विजेता ठरला आहे.