नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास

ऑनलाइन फूड डिलिव्हरी विश्वात धुमाकूळ घालणाऱया झोमॅटोचा जन्म नागपुरातून झाल्याची रंजक माहिती झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राकेश रंजन यांनी रविवारी ‘फायर साइड चॅट’दरम्यान दिली.

खासदार औद्योगिक महोत्सव-ऍडव्हांटेज विदर्भच्या दुसऱया दिवशी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. या चर्चासत्राची सुरुवात झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी एंजेल इन्व्हेस्टर शशिकांत चौधरी यांनी राकेश रंजन यांना बोलते केले. झोमॅटोच्या प्रवासाबाबत सांगताना राकेश रंजन म्हणाले, ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऍप सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक जे खाद्यपदार्थ कुठल्याही पारंपरिक हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये खाऊ शकत नाहीत असे पदार्थ ऑर्डर करायचे. वेगळय़ा प्रकारच्या, नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांचे ऑर्डर अधिक यायचे. त्यानंतरच्या टप्प्यात नियमित ग्राहक वाढलेत. ते रोजच्या नाश्त्यातील, जेवणातील पदार्थ मागवू लागलेत. त्यामध्ये प्रामुख्याने पिझ्झा, डेझर्ट यांचा समावेश होता. आता ग्राहकांना राजस्थानी तसेच इतर प्रादेशिक जेवण त्या-त्या पारंपरिक अनुभवासह हवे आहे. त्या दृष्टीने आम्ही ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करतोय. हे एक नवीन आव्हान आमच्यापुढे आहे.’