डॉक्टरचे घर साफ करणाऱ्या चोराला उत्तर प्रदेशात अटक

1535

सामना प्रतिनिधी । मुंबई

ताडदेव येथील एका नामांकित डॉक्टरच्या बंद घरातून साडेअकरा लाखांचा ऐवज चोरून पसार झालेल्या आरोपीला ताडदेव पोलिसांनी पकडले. उत्तर प्रदेशात जाऊन लपलेल्या त्या सराईत चोराच्या मुसक्या आवळून त्याला मुंबईत आणले. शिवाय त्याच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्याला सराफालादेखील बेड्य़ा ठोकल्या.

हाजीअली येथील सरकारी वसाहतीत डॉ. मिलिंद नारकर हे राहतात. ३ तारखेला ते व त्यांची पत्नी घर बंद करून कामाला गेले होते. सायंकाळी डॉ. नारकर घरी परतल्यावर कपाटातील साडेअकरा लाखांचा ऐवज चोरल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरुण थोरात, कांबळे, सांगळे, अडागळे, कापसे, पेडणेकर, सर्जिणे या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. आधी या पथकाने क्राइम ब्रँचच्या मदतीने इब्राहिम शेख याला पकडले. त्याच्या चौकशीत सिद्धू भैयालाल राजपूत याने ही घरफोडी केल्याचे व तो यूपी येथील कान्हेमय गावात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार थोरात व त्यांच्या पथकाने यूपी गाठून सिद्धूच्या मुसक्या आवळल्या. तसेच सिद्धू चोरीचे दागिने तेथील सराफ रवी वर्मा याला विकले होते. त्यामुळे रवी यालादेखील अटक केली. सिद्धू हा सराईत चोर असून त्याच्याविरोधात बोरीवली, माटुंगा, कस्तुरबा मार्ग, एलटी मार्ग पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांना चकवा देऊन पळाला, भाईंदरमध्ये सापडला
पोलिसाला ढकलून जे जे हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या चोराला व्ही पी रोड पोलिसांनी २४ तासांच्या आत भाईंदर येथे पकडले. संजय कश्यप (१९)असे त्या आरोपीचे नाव आहे. व्ही पी रोड पोलिसांनी संजय याला मोबाईलच्या गुह्यात अटक केली होती. प्रकृती अस्वस्थाची तक्रार केल्याने त्याला उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र बाथरूमला जायचा बहाणा करून त्याने पोलिसाला ढकलून पळ काढला होता. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र व्ही पी रोड पोलिसांनीच संजयच्या भाईंदर येथे मुसक्या आवळल्या.