फॅशनेबल काळा…!

‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे आवाजात गोडवा ठेवून आपल्या आप्तेष्ट आणि प्रियजनांच्या हातांवर तिळगूळ ठेवत मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्याचा आपला लाडका सण अगदी चार दिवसांवर आलाय. मकरसंक्रांत आणि काळय़ा रंगाचे कपडे यांचे नेमके समीकरण काय हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसले तरी हाच काळा रंग आपल्या संस्कृतीत अन्य सणांना (गणेश उत्सव, दिवाळी-दसरा) -शुभ प्रसंगांना घातला तर तो अशुभ मानला जातो. पण संक्रातीच्या पंधरवडय़ामध्ये मात्र विशेषतः अनेक महिला-मुली आवर्जून काळय़ा रंगाच्या साडय़ा ‘चंद्रकळा’, काळय़ा रंगाचे खडीचे ड्रेस, काळय़ा नक्षीदार ड्रेसला प्राधान्य देतात.

हिंदू धर्मातील बहुतेक सणांना त्या त्या ऋतुमानानुसार शास्त्रीय महत्त्व आहेच. हे महत्त्व आहार-विहार, जीवनशैली आणि आपले परिधान अर्थात ज्याचा थेट संबंध आपल्या दैनंदिन फॅशनशी येतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. भास्कराचे एका राशीतून दुसऱया राशीत प्रवेश करणे-संक्रमण होण्यालाच मकरसंक्रांत असे नाव पडले आहे. या दिवशी रात्र मोठी असते आणि याच दिवसापासून दिनमान वाढू लागते. मोठय़ा रात्रीला काळय़ा रंगाची वस्त्र नेसण्याचा प्रघात आहे. सफेद रंग उष्णता परावर्तित करतो, शोषत नाही. नेमके उलट आहे काळय़ा रंगाचे. या मोसमात थंड वातावरण असते. काळा रंग उष्णता शोषतो म्हणूनच या सणादरम्यान काळय़ा रंगाचे परिधान वापरण्याची प्रथा पडली असावी, जो गेली अनेक वर्षे ‘फॅशन ट्रेंड’ पडला आहे.

ब्लॅक इज ब्युटिफूल
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना जाजू यांनी संक्रांतीदरम्यान काळय़ा रंगाचे महत्त्व अधोरेखित केले. काळा रंग साधेपणा, ताकद आणि अष्टपैलू अशा अनेक छटा दर्शवतो. आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा बेजोड संगम म्हणजे काळा रंग. हल्ली अनेक विवाहप्रसंगी रिसेप्शनला काळय़ा रंगाचा शिमरिंग गाऊन घालण्याचा ट्रेंड दिसून येतो. गेल्या काही वर्षांपूर्वी मात्र निषेध किंवा शोक या भावना दर्शवण्यासाठी काळय़ा रंगाचे परिधान घातले जात असत. अलीकडची काही वर्षे ‘ब्लॅक इज ब्युटीफूल’ इतके महत्त्व काळय़ा रंगाला मिळाले आहे. हा रंग प्रामुख्याने सेलिब्रिटीज वापरतात असा ट्रेंड दिसून येतो. इव्हिनिंग इव्हेंट, पार्टीसाठी काळय़ा रंगाचे कपडे ‘हटके’ लुक देतात हे नक्की. काळय़ा रंगाला एक वेगळेच आकर्षण, गूढतेची झालर आढळून येतेय. टाइमलेस फॅशन, फ्लॅटरिंग सिल्व्हेट्स यासाठी काळय़ा रंगाचा मोठय़ा प्रमाणात वापर वाढला आहे. काळय़ा रंगात एकूण व्यक्तिमत्त्व सडपातळ दिसून येते असेदेखील आढळून आले आहे. खास कार्यक्रमांमध्ये काळय़ा रंगाची जॉर्जेट साडी, काळा तलम ड्रेस अंडर स्टेटेड मेकअप तुमचा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढवतो. लक्षवेधी आणि ग्लॅमर लुकसाठी काळय़ा रंगाला जगभर मान्यता मिळाली आहे.
पूजा सामंत